
नवी दिल्ली – अखेर लालकृष्ण अडवाणी यांनी नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले. दिवसभरातील भेटी आणि चर्चेनंतर अडवाणी यांनी गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी अडवाणी गांधीनगर ऐवजी मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघातून इच्छूक होते. मात्र पक्षाने त्यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यामुळे नाराज झालेल्या अडवाणींची अखेर समजूत काढण्यात पक्षातील नेत्यांनी बुधवारी रात्रीपासून त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मतदारसंघाच्या निवडीचा अधिकार पूर्णपणे अडवाणींना असल्याचे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी गुरुवारी सांगितले.गुजरातमधील गांधीनगर अथवा मध्यप्रदेशातील भोपाळ यापैकी त्यांना हव्या त्या मतदार संघातून अडवाणी निवडणूक लढवू शकतात. तो अधिकार त्यांना आहे, असे सिंग यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढवणार असल्याचेे जाहीर केले. त्याआधी गांधीनगरमधून निवडणूक लढवण्यास अडवाणींनी राजी व्हावे यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी अडवाणींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुषमा स्वराज आणि अरुण जेठली यांनीही अडवाणी यांची भेट घेतली होती.









