महिलेसह दोन जणांना अटक; पिंपरी पोलिसांची कामगिरी
पिंपरी – एक हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या महिलेसह दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 71 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.
शमसुद्दीन रहेमान शेख (वय 30, रा. कापसे चाळ, पवनेश्वर मंदिराजवळ, पिंपरी) व जोहरा मन्सूर शेख (वय 55, रा. बौद्धनगर, बिल्डिंग नंबर 16, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस नाईक शिवराज कलांडीकर यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त मोहन विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे, सहायक निरीक्षक आर. आर. ठुबल, संतोष पाटील, पोलिस हवालदार बाबा इनामदार, नागनाथ लकडे, महादेव जावळे, सुभाष पाटील, खोडगे, महिला पोलिस शिपाई पाटील, महानवर यांच्या पथकाने कापसे चाळीत छापा टाकून शमसुद्दीनला ताब्यात घेतले.
वरिष्ठ निरीक्षक डॉ. मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरात ज्यूस विक्री करणाऱ्या शमसुद्दीनच्या घरावर छापा घातला. तेथील लोखंडी कपाटात एक हजार रुपयांच्या 106 व पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा मिळाल्या. तसेच, 100 रुपयांच्या 84 व दहा रुपयांच्या 36 खऱ्या नोटाही मिळून आल्या. त्याच्याकडून जोहराचे नाव कळाले. ती त्याची सावत्र सासू आहे. जोहराकडेही बनावट नोटा असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर बौद्धनगर येथील जोहराच्या घरावर छापा घालून एक हजार रुपयांच्या 61 आणि पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा जप्त केल्या. याशिवाय 100 रुपयांच्या 23 तर दहा रुपयांच्या 42 खऱ्या नोटा मिळून आल्या. याशिवाय नऊ मोबाईलही हस्तगत केले.
दरम्यान, शमसुद्दीनच्या घरातून वेगवेगळ्या नावाची तीन बनावट पॅनकार्ड आढळली. त्याने गेल्या तीन महिन्यात चार लाख 31 हजार रुपये इको बॅंकेच्या खात्यात भरल्याचे समोर आले आहे. बनावट नोटांच्या या धंद्यात एक हजाराची नोट चलनात आणली तर खरे पाचशे रुपये नोटा पुरविणाऱ्यास द्यावे लागतात.
बांगलादेश सीमेवर केंद्र
पिंपरी पोलिसांनी सप्टेंबर 2014 मध्ये नऊ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. या धंद्याचे रॅकेट बांगलादेश सीमेवरील मालदा येथे आहे. त्या वेळी पोलिस उपनिरीक्षक हरीश माने यांच्यासह पोलिस पथक सदर ठिकाणी जाऊन आले. मात्र, आरोपी मिळू शकले नव्हते.
अशी होती कार्यपद्धती
ग्रामीण भागात किंवा आठवडे बाजारात जाऊन 100 किंवा 150 रुपयांचे सामान खरेदी करायचे. त्यासाठी एक हजार रुपयांची बनावट नोट द्यायची. उर्वरित खरे पैसे घ्यायचे, अशी आरोपींची कार्यपद्धती होती. ज्या दुकानात बनावट नोटा तपासणी करण्याचे यंत्र आहे, त्या दुकानात ते खरेदीसाठी जात नसत.