
मुंबई, दि. १८ – बँकाकमध्ये झालेल्या शक्तीशाली बाँबस्फोटातून अभिनेते रितेश व जेनेलिया देशमुख थोडक्यात बचावले आहेत.
ज्या मंदिराजवळ हा स्फोट झाला त्यावेळी ते दोघे तेथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मॉलमध्ये होते. जेनेलियाने या स्फोटाची माहिती देतानाच आपण सुरक्षित असल्याचेही म्हटले.
‘ आम्ही सध्या ज्या मॉलमध्ये आहोत त्यासमोर बाँबस्फोट झाला आहे. मदत कार्यासाठी आलेल्या यंत्रणांच्या सायरनचे आवाज इथे स्पष्ट ऐकू येत आहेत. इथे (मॉलमध्ये) आम्ही सुरक्षित असलो तरी या स्फोटात ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्याबद्दल खूप दु:ख होत आहे’ असे ट्विट जेनेलियाने केले आहे.
काल संध्याकाळी हिंदू मंदिर एरावनच्या बाहेर झालेल्या या स्फोटात २७ ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. ब्रह्माचे हे मंदिर बाजारपेठेतून जाणा-या मुख्य रस्त्यावर असून त्याच्या भोवती तीन मुख्य शॉपिंग मॉल्स आहेत. त्यापैकी एका मॉलमध्येच रितेश -जेनेलिया शॉपिंग करत होते.
Archive for August, 2015
0
स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले
0
सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल कोर्टाला मिळाल्याचे वृत्त असून या ई-मेलनंतर सुप्रीम कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इंटर्न वकीलांना कोर्टरूममध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
‘एनडीटीव्ही’ने सू्त्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. हा मेल गेल्या आठवड्यात आला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांना सुरक्षेचा फेरआढावा घेतानाच जादा फौजफाटा कोर्टाच्या इमारतीभोवती तैनात केला आहे. याआधी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्र यांना ७ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीने चिठ्ठीद्वारे धमकी दिली होती. मिश्र यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूस सुरक्षा रक्षकाला हिंदीत लिहिलेली चिठ्ठी आढळली होती. ‘आपल्याभोवती सुरक्षा व्यवस्था असली तरी आम्ही तुम्हाला संपवू’, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत लिहिण्यात आला होता. गंभीर बाब म्हणजे १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाच्या ज्या पॅनलने अंतिम निर्णय दिला त्यात मिश्र यांचाही समावेश होता. मिश्र यांच्या पॅनलने ३० जुलै रोजी याकूबच्या फाशीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. या निकालानंतरच मिश्र यांना धमकीची चिठ्ठी आली होती. या चिठ्ठीनंतर मिश्र यांच्याबरोबरच याकूब प्रकरण हाताळणाऱ्या सर्व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा दिल्ली पोलिसांनी आढावा घेतला होता.
पुरंदरेंना हात लागला तर तांडव : राज ठाकरे
मुंबई – ‘याद राखा, बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रात तांडव करेन’, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार आणि भाजपमधील काही मंत्र्यांचं गलिच्छ राजकारण आहे, असा आरोपही राज यांनी केला.
बाबासाहेब पुरंदरे यांना उद्या राजभवनात छोटेखानी समारंभात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यास अनेक संघटनांनी केलेला विरोध तसेच पुरस्कार वितरण सोहळा उधळून लावण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर राज यांनी आज मैदानात उतरत पुरंदरेविरोधकांना ‘आवाज’ दिला.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमधीलच काही मंत्र्यांनी मिळून हे सगळं कुभांड रचलं आहे. मला फडणवीस यांची बाजू घ्यायची नाही मात्र ते खुर्चीवर बसल्यापासूनच हे राजकारण सुरू झाले आहे. पवारांना भाजपमधील कोण कोण सामिल आहेत ते मला महित आहेत पण मी त्यांची नावे सांगणार नाही. फडणवीस ज्युनियर आहेत. ब्राम्हण आहेत. म्हणूनच हे जातीचं राजकारण चाललंय. पवारच विष कालवण्याचे काम करत आहेत’, अशी तोफ राज यांनी डागली.
बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा साक्षात्कार आता ५० वर्षांनतर कसा काय झाला?, असा सवाल राज यांनी केला. शरद पवार यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता. आत्ता आत्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. अजित पवारही त्यांचा आदर करतात. मग आता अचानक हे घुमजाव कशासाठी?, असा सवालही राज यानी विचारला. केवळ एखाद्या वाक्यासाठी संपूर्ण शिवचरित्रावर आक्षेप घेणे योग्य नाही. त्यातही जे आक्षेप आहेत त्यावर खुली चर्चा होऊ शकते. त्यासाठी एवढा गदारोळ माजवण्याची गरज नाही, असे राज यांनी ठणकावले. राज यांनी कृष्णनीतीचाही यावेळी दाखला दिला. कृष्णाच्या १६ हजार बायका होत्या यावर चर्चा करत बसायचं की कृष्णनीतीचं आचरण करायचं?, असा सवाल राज यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांचाही राज यांनी समाचार घेतला. पवारांच्या गलिच्छ राजकारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्यात एवढं बोलण्याची हिम्मत आली आहे. पवारांनीच आव्हाड यांना फूस लावली आहे, असा आरोप राज यांनी केला. माझ्या आजोबांच्या पुस्तकातील दाखले आव्हाडांनी देऊ नयेत, असेही राज यांनी सुनावले.
नेमाडे यांच्यावरही टीका
पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणारे ज्ञानपीठप्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्यावरही राज यांनी टीका केली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रज वा विंदांच्या आचरणातून घ्यायला हवेत, असा टोला राज यांनी लगावला. नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यासही विरोध झाला होता तरीही त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलाच ना, असा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला.
0
केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’
यवतमाळकरांची मार्शलला भावपूर्ण श्रद्धांजली
यवतमाळ दि. १८ – विलक्षण प्रतिभा असलेले केतन पिंपळापुरे यांची साहित्य निर्मिती जागतिक साहित्याच्या दालनात झेपावत होती. ‘हेमलॉक’ हा कवितासंग्रह त्यांच्या जगण्याची भीषणता चितारणारा होता. सत्याचे कडू घोट घेत त्यांनी ‘नोबल ट्रूथ’ वैश्विक उंचीचा सृजनात्मक अविष्कार घडविला. आंबेडकरी साहित्यात नवे सौंदर्यशास्त्र जन्मास घालणारा केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’ होय, अशा शब्दात यवतमाळकरांनी मार्शलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्थानिक लॉर्ड बुद्धा टीव्ही कार्यालयात समता सैनिक दलाच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. सूरज ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून महाकवी वामनदादा कर्डक महाकाव्याचे चरित्रकार डॉ. सागर जाधव, चित्रकार बळी खैरे उपस्थित होते. आपल्या विलक्षण काव्यप्रतिभेने केतन पिंपळापुरे यांनी मराठी साहित्याचे अंतरंग ढवळून काढले. श्रद्धांजली सभेत केतन पिंपळापुरे यांच्या चौफेर लेखन व कार्यकर्तुत्वाच्या शैलीवर उपस्थितांनी प्रकाश टाकला. डॉ. सागर जाधव म्हणाले की, कार्यकर्ता, आंदोलक म्हणून केतनने सर्व आघाड्यांवर रणशिंग फुंकले होते. आंबेडकरी अस्मितेचा धगधगता ज्वालामुखी म्हणून समता सैनिक दलाची कमान आपल्या खांद्यावर घेतली होती. ‘सूर्यकंकण’ हाताशी बांधून व्यवस्थेच्या तटबंधीला घाम फोडत धावत निघालेली केतनची कविता प्रबुद्ध जगाचे नेतृत्व करणारी होती. एका योद्ध्याची कणखर भूमिका ती बजावत होती. चळवळीचा सेनापती म्हणून आपल्या घरादाराची पर्वा न करता त्यांनी आंबेडकरी आंदोलन गतिमान केले. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पक्ष या मातृसंस्थांना समर्पित होऊन कार्य करणे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपणे, हीच केतनला खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले. सोबतच बळी खैरे, डॉ. सूरज ढाले, प्रा. प्रकाश दातार, कवी विनोद बुरबुरे, भास्कर चव्हाण, डॉ. अशोक कांबळे, मन्सूर एजाज जोश, प्रा. सिद्धार्थ भगत, योगानंद टेंभुर्णे आदींनी केतन पिंपळापुरे यांच्यातील कवी, आंदोलक, पत्रकार, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत आदी पैलूंवर विचार व्यक्त करीत आठवणींना उजाळा दिला. संचालन जगदिश भगत यांनी तर आभार विलास नरांजे यांनी मानले. सभेला समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक नरेश ताकसांडे, पद्माकर घायवान, विजय वासनिक, विजय तोडेकर, देवानंद भगत, सूरज पाटील, राहुल पाते, गौतम कांबळे, चंद्रबोधी घायवटे, शांतरक्षित गावंडे, प्रा. नीलेश भगत, विजयकुमार गाडगे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील यवतमाळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
अमिताभ महाराष्ट्राचे व्याघ्र संरक्षणाचे अँबॅसिडर
मुंबई – हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्याघ्र संरक्षणासाठी काम करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मान्य केला आहे. यापुढे अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या वाघ संरक्षण योजनेचे ब्रॅंड अँबॅसिडर असतील. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना पत्र लिहून व्याघ्र संरक्षण योजनेचे ब्रँड अँबॅसिडर होण्याचे निमंत्रण दिले होते. वाघांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करुन व्याघ्र संरक्षण आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आपण व्याघ्र संरक्षण योजनेचे अँबॅसिडर व्हावे असे मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले होते.
दंगली घडविण्यासाठीच याकूबच्या फाशीचे प्रदर्शन
मुंबई- हिंदु आणि मुसलमान समाजामध्ये तणाव निर्माण व्हावा. त्यातून उसळणा-या दंगलीवर आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीचे प्रदर्शन केले, अशी सणसणीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाणे येथे केली. मन की बात करणारे नरेंद्र मोदी आता का मौन धरून बसले आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
ठाणे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे प्राण घेणा-या याकूब मेमनच्या फाशीचे राजकारण का करता? त्याचे प्रदर्शन करतात? आणि प्रसार माध्यमेही त्यांच्याबरोबर वाहवत जातात. याकूब मेमनने कधी नाश्ता केला, त्याने कोणते पुस्तक वाचले. किती वाजता फाशी दिली. नागपूरला विमान निघाले. मुंबईत पोहचले. मिनिटामिनिटाची खबर. कशासाठी दाखवता? कहर म्हणजे याकूबचा भाऊ टायगर मेमन त्याच्या आईशी बोलतो आणि सांगतो ‘मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.’ तो जे आपल्या आईशी बोलला तो शब्द अन् शब्द कसा काय छापून येतो. याचा अर्थ कुणी तरी पोलिसांनीच ही माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचविली असेल. कशासाठी? ही इतकी साधी गोष्ट नाही. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. याकूबच्या फाशीचे प्रदर्शन पाहून मुस्लीम तरुणांची माथी भडकावीत आणि टागर मेमनची मुलाखत वाचून हिंदू तरुणांची माथी भडकावीत. त्यांच्यात दंगल व्हावी आणि त्या दंगलीच्या आगीत आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने याकूबच्या फाशीचे असे राजकारण केले.
राज्यात भाजपाचे सरकार आल्याने सामान्य माणसाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे केवळ शोभेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हात आणि पाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बांधलेले आहेत. ते स्वत: कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. राज्यातील भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला ऊत आलेला आहे. मला एक सरकारी अधिकारी भेटले होते. त्यांनी सांगितले की गेल्या आठ महिन्यात केवळ शासकीय अधिका-यांच्या बदल्या करण्यासाठी १०० कोटींची उलाढाल झाली. असे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि मराठी माणसाला काय न्याय देणार? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
याकूब मेमनला फाशी दिल्यावर तमाशा बनवून ठेवला, यावरुन असे वाटते की, या सरकारला दंगली हव्या आहेत. इतक्या लवकर या सरकारचे भांडाफोड होईल असे वाटले नव्हते, चांगल्या रन काढण्याऐवजी चिक्की रन काढीत आहेत. बाबासाहेब पुरुंदरे यांच्या नावावर राजकारण सुरु आहे, हे निंदनीय आहे. वय वर्ष ९० असणा-या बाबासाहेबांना राष्ट्रवादी नेते एकेरी नावाने हाक मारतात, तो एक ठाण्याचा वळवळतो आहे. लायकी आहे का बाबासाहेबांबद्दल यांची बोलण्याची. आपल्याकडे कुंपणच शेत खातं आहे. आपलेच अधिकारी परप्रांतीयांना खोटे दाखले देत आहेत. परप्रांतियांना पोसण्याचे काम दुर्दैवाने भाजप सरकार करीत आहे. तिकडे ते नरेंद्र मोदी गप्प बसतात, कसली मन की बात. मोदी म्हणजे शेवटची आशा आहे, पण तेच जर गुजरातचा जप करतात. मोदी आणि शहा सत्तेत आल्यापासून गुजराती समाजाला कसलं फेफडं आलं आहे? नॉनव्हेज खाण्यास बंदी, गुजराती समाजातील नागरिकांची ही कोणती जबरदस्ती, असा सवाल राज यांनी यावेळी केला. जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारलीच पाहिजे, असे आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केले.माझी आणि उद्धवची भेट झाल्याची बातम्या पुरविल्या जात आहेत, भेट नाही, गाठ नाही… यांच्या राजकारणासाठी ‘या’ बातम्या पुरवल्या जात आहेत, असेही राज यांनी स्पष्ट केले.
झारखंड मंदिरात चेंगराचेंगरी : ११ भाविक ठार
रांची, दि. १० – झारखंडमधील देवघर जिल्ह्यात मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार तर ५० जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथील वैद्यनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जलाभिषेकासाठी कावडवाले रांगेत उभे असताना काही भाविकांनी रांग तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की झाली. ज्याचे रुपांतर चेंगराचेंगरीत होऊन ११ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले तर ५० जण जखमी झाले.
मंदिराचा दरवाजा उघडल्याची अफवा पसरल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिकी मिळत आहे.
दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींमा ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
0
पॉर्न साईट्सवर बंदी शक्य नाही – केंद्राची कबुली

नवी दिल्ली, दि. १० – पोर्नोग्राफी किंवा अश्लील सिनेमे दाखवणा-या वेबसाईट्सवर सरसकट बंदी घालता येणार नाही अशी कबुली केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. पॉर्न साईट्सवर केंद्र सरकारने गुपचूर बंदी घातल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात विरोधी सूर व्यक्त झाला होता. त्यानंतर सरकारने केवळ मुलांचा समावेश असलेल्या पॉर्न साईट्सना बंदी असल्याचा खुलासा केला.
या संदर्भात दाखल करण्यात येणा-या याचिकेवर सोमवारी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करता येणार नसल्याचे सांगत बंद खोलीमध्ये सज्ञान नागरिकांनी इंटरनेटवर काय बघावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असून त्यात हस्तक्षेप करता येणार नाही हे सांगतानाच आम्ही प्रत्येकाच्या बेडरूममध्ये उपस्थित राहू शकत नाही अशा शब्दांत भारताच्या अॅटर्नी जनरलनी पॉर्न बंदीस असमर्थता दर्शवली आहे. यामुळे पॉर्न साईट्स पुन्हा पहिल्यासारख्या उपलब्ध असतील असा दिलासा आंबटशौकिनांना मिळालेला आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या या खुलाशानंतर सुनावणीला तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे.
0
वाहतूक पोलीसालाच पळवण्याचा प्रयत्न

पुणे, दि. १० – वाहतूक सुरळित ठेवण्याचं तसेच चालकांना शिस्त लावण्याचं काम करणा-या वाहतूक पोलीसालाच पळवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार पुण्याच घडला आहे. मयूर मंडले हे वडगाव पुलाजवळ आपली ड्युटी करत होते. त्यावेळी एका कारला त्यांनी थांबवले, व कागदपत्रांची विचारणा केली. कुठलही कागदपत्रे देण्यास चालकाने नकार दिल्यामुळे कंडले गाडीत बसले आणि त्यांनी गाडी पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितले. यावेळी या गाडीच्या चालकाने गाडी भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने दामटली आणि मंडले यांनाच मारहाण करण्याची धमकी दिली. मंडले यांनी प्रसंगावधान राखून वॉकीटॉकीवरून हा प्रकार आपल्या सहका-यांना कळवला. लगेच त्यांच्या सहका-यांनी दुस-या गाडीतून या कारचा पाठलाग केला आणि त्यांना चांदणी चौकाजवळ पकडले. या गाडीतल्या दोघाजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.










