
गोंदिया – सालेकसा तालुक्यातील सालईटोला गावाच्या लिलुकुचा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य सापडले आहे. गोंदिया नक्षल सेल आणि सालेकसा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जंगल परिसर पिंजून काढण्यात आला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य मिळाले.
सालईटोलाच्या लिलुकचुवा वनक्षेत्रामध्ये एका ड्रममध्ये घालून हे साहित्य पुरले होते. यामध्ये नॉन इलेक्ट्रिक २७ नग डेटोनेटर ४८ नग, काळ्या रंगाची स्फोटक पावडर ५०० ग्रॅम, पांढऱ्या रंगाची स्फोटक पावडर १०० ग्रॅम, सिल्वर रंगाची स्फोटक पावडर १० ग्रॅम, सिल्वर रंगाची स्फोटक कांडी १०० ग्रॅम – २ नग, नियोडाईन, एक वॉकमन, एक कॅसेट, प्लास्टिक बॉक्स, कॅम्पस ट्रेकिंग बुटाच्या ६ जोड्या, तुरटी सारखा दिसणारा पदार्थ १०० ग्रॅम या गोष्टींचा समावेश आहे. एखादी घातपाताची कारवाई करण्यासाठी हे साहित्य पुरुन ठेवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
Archive for April, 2015
0
सालेकसा तालुक्यात सापडले नक्षली साहित्य
0
९ हजार एनजीओंचे परवाने रद्द

नवी दिल्ली, दि. २८ – परदेशातून देणग्या स्वीकारणा-या गैरसरकारी संस्थांवर (एनजीओ) मोदी सरकारने कारवाईचा धडाका सुरु केला असून सोमवारी रात्री सरकारने तब्बल ८,९७५ एनजीओंचे परवाने रद्द केले आहेत. मोदी सरकारच्या या आक्रमक पवित्र्यांनी एनजीओ चालवणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने ग्रीनपीस संघटनेच्या विदेशातून मिळणा-या मदतीवर निर्बंध घातले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील १०, ३४३ एनजीओंना नोटीस पाठवत २००९ -१०, २०१० -११ आणि २०११ -१२ या आर्थिक वर्षातील रिटर्न सादर करायला सांगितले होते. यात परदेशातून मिळालेल्या देणगीचा नेमका आकडाही समजणार होता. यातील फक्त २२९ एनजीओंनी त्यांचा वार्षिक लेखाजोखा गृहमंत्रालयाला सादर केला आहे. गृहमंत्रालयाच्या नोटिसीला उत्तर न देणा-या ८, ९७५ एनजीओंचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी रात्री उशीरा करण्यात आली. यातील ५१० एनजीओ अशा आहेत ज्यांना नोटीस पाठवण्यात आली मात्र ती कोणीच स्वीकारली नसल्याने नोटीस परत आली.
0
भिषण अपघातात तीन ठार

यवतमाळ , दि. २७ – दारव्हा-कारंजा मार्गावरील सावंगी (रेल्वे) येथे स्विफ्ट कार आणि टाटा एस वाहनात आज सोमवारला दुपारी ३.४० वाजता समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात तीन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले.
कारंजा कडून दारव्हा कडे येणारी एमएच २९ एडी ६३०४ क्रमांकाच्या कारला विरुद्ध दिशेने येणाºया एमएच २९ टी ६८४७ क्रमांकाच्या टाटा एस वाहनाने समोरासमोर धडक दिली. कार मधील केशव इहरे, सुभाष इहरे आणि शेषराव इहरे सर्व रा. डेहणी ता. दिग्रस यांना जखमी अवस्थेत कारंजा येथील नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अपघाताता सायखेडा निवासी विठ्ठल बागल व दारव्हा निवासी राज ठाकूर गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना यवतमाळ येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. अपघातातील तीनही मृतक एकाच परिवारातीलअसून सोयरिक जोडण्यासाठी कारंजाला गेले होते. धडक इतकी जोरदार होती की टाटा एस वाहन अडकलेल्या जखमींना गावकºयांनी वाहनाचे दार कुºहाडिने तोडून बाहेर काढले. मृतक सुभाष इहरे दिग्रस स्टेट बँकेत वरिष्ठ रोखपाल पदावर कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली आणि पंचनामा करून पूढील कारवाई सुरू केली.
0
क्रिकेट सट्ट्यावर धाड, साहित्यासह एकास अटक
यवतमाळ, दि. २७ – आयएपिएल क्रिकेट स्पर्धेत अनेकांनी सट्टा लावल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने प्रभात नगर येथील अड्ड्यावर धाड मारली. यावेळी एका आरोपीस अटक करून ५९ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले.
सुनील भास्कर हमदापूरे (३६) रा. प्रभात नगर रेणुका मंगल कार्यालयासमोर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्घ राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिलस विरूद्घ रॉयल चॅजेंजर्स बंगळुरू याच्यात क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यावर सट्टा सुरू असल्याची गुप्त माहीती यवतमाळ येथील उपविभागीय पोलीस अधिकाºयांचा पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने हमदापूरे यांनी भाड्याने घेतलेल्या सोनु घोडे यांच्या घरी सुरू असलेल्या सट्ट्यावर धाड टाकली. यामध्ये टीव्ही , लॅपटॉप, मोबाईल, ५ हजार ३०० रुपये नगदी असा एकुण ५९ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी मुंबई जुगार कायद्या अंतर्गत ४,५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सुनील हमदापूरेला अटक केली. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, वडगाव रोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, इकबाल शेख, ऋतुराज मेंढवे, संतोष मडावी, प्रमोद मडावी यांनी केली.
0
भू-संपादनाविरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वात विदर्भातून लाँगमार्च

नागपूर – भू-संपादन कायद्यावरून केंद्र सरकारविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विदर्भातून लाँगमार्च काढण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यातून या लाँगमार्चला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
भूसंपादन कायद्याविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नव्या दमाने उतरणार आहे. भूसंपादन कायद्यासाठी एकमत करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गडकरींवर सोपवली आहे. त्यानंतर गडकरी लगेच कामालाही लागले. काँग्रेसनेही त्यांना शह देण्यासाठी भूसंपादन कायद्याविरोधात लाँगमार्चसाठी विदर्भाची निवड केली आहे. गांधी त्याकरीता नागपूर-अमरावतीला येणार असल्याची माहितीही काँग्रेस सूत्रांकडून मिळाली. दुष्काळ, गारपीट यामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना भूसंपादन विधेयकामुळे तो देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे मोदी सराकर कसे उद्योजकधार्जिणे आणि शेतकरीविरोधी आहेत. हे सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लाँगमार्च काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे.
0
अर्थमंत्रालयाने शोधला ७,८०० कोटी काळा पैसा

नवी दिल्ली- परदेशातील काळा पैसा १०० दिवसात परत आणू, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने एक पैसाही आजपर्यंत परत आणला नाही. मात्र मागील वर्षी झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशात आणि परदेशात मिळून सात हजार ८०० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या ताज्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
या काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संख्या ही प्रचंड असल्याचे आर्थिक गुप्तचर संस्थेच्या चौकशीत उघडकीस आले आहे. देशांतर्गत केलेल्या या कारवाईत हजारो कोटी जप्त करण्यात आले असले आणि गैरप्रकार उघडकीस आणले असले तरी परदेशातील काळ्या पैशाचा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे.
अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार, मागील वर्षी केलेल्या कारवाईद्वारे प्राप्तिकर विभागाने एकूण ७,०७८ कोटी रुपयांच्या, तर सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाने ७५० कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा छडा लावला आहे. या काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संख्या ही प्रचंड असल्याचे आर्थिक गुप्तचर संस्थेच्या (एफआययू) चौकशीत उघडकीस आले आहे.
देशभरातील विविध आर्थिक संस्थांकडून मिळालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबतच्या अहवालांचा (एसटीआर) अभ्यास अर्थमंत्रालयाच्या निदर्शनाखाली केला असल्याचे अर्थ मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. तसेच वसुली संचनालयानेही सुमारे २० कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यांचा शोध लावला असून, १७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
एफआययूने यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. पीटीआयला हा अहवाल प्राप्त झाला असून, या अहवालात मागील वर्षभरात माहिती तंत्रज्ञान विभागाने सुमारे १६३ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. तसेच २०१३- १४ या आर्थिक वर्षामध्ये सक्तवसुली संचनालयाने १०५ गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. २०१२- १३ च्या तुलनेत हे प्रमाण शंभर टक्क्याने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
0
नेपाळ भूकंपात ३७०० बळी

काठमांडू- नेपाळसह उत्तर भारताला हादरवून सोडणा-या भूकंपामुळे आतापर्यंत तीन हजार सातशे जणांचा बळी गेला आहे तर ६५०० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळच्या आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख रामेश्वर दंगल यांनी दिली. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.
डोंगर आणि द-याखो-यांमध्ये वसलेली २००. ३०० आणि १००० लोकसंख्या असलेली संपूर्ण गावेच्या गावे मातीच्या ढिगा-याखाली गाडली गेली आहेत. येथे जाण्यासाठी रस्तेही राहिले नाहीत. या भागात हेलिकॉप्टरमधून पाहणी केली असता हे भीषण वास्तव समोर आल्याचे पोलीस उप महानिरीक्षक कोमल सिमग बाम यांनी सांगितले.अजूनही ढिगा-याखाली हजारो लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे मदतकार्य सुरु असतानाच रविवारी रात्री पाऊस कोसळू लागल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. वारंवार धक्के जाणवत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.नेपाळमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. पुढील ४८ तास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. दरडी कोसळण्याचीही शक्यता आहे.
0
घरातील स्वच्छतागृहासाठी ११ वर्षाच्या मुलीने सोडले जेवण

भोपाळ, दि. २७ – मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ११ वर्षाच्या ताराने घरात वडिलांनी स्वच्छतागृह बांधावा यासाठी दोन दिवसासाठी उपोषण केले. पैशाअभावी ताराच्या वडिलांना स्वच्छतागृह बांधता येत नव्हते, अखेरीस स्थानिक प्रशासनाने आर्थिक मदत दिल्याने ताराच्या घरातील स्वच्छतागृहाचे काम सुरु झाले आहे. सागर जिल्हा प्रशासनाने स्वच्छता मोहीमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ताराची नियुक्ती केली आहे.
सागर जिल्ह्यातील किरोड गावात राहणारी तारा बन्सल ही गावातील सरकारी शाळेत सहावी इयत्तेत शिकते. काही दिवसांपूर्वी ताराच्या शाळेत एका समाजसेवी संस्थेने स्वच्छतेसंदर्भात जनजागृती अभियान राबवला होता. उघड्यावर शौचालयास जाऊ नये असा संदेशही या अभियानातून देण्यात आला होता. तारा या अभियानामुळे प्रभावित झाले व तिने घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी तगादा लावला. ताराचे वडिल महेश आणि काका पुरुषोत्तम हे दोघे शेतमजूर म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बन्सल कुटुंबाच्या घरात स्वच्छतागृह नव्हते. यामुळे तारा व घरातील अन्य महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. चिमुकल्या ताराने या विरोधात लढा देण्याचा निर्धार करत दोन दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही. वडिलांनी आधी घरात शौचालय बांधावे असे तिचे म्हणणे होते. मुलीच्या हट्टाखातर महेश बन्सल यांनी शौचालयाचे बांधकाम सुरु केले. मात्र पैशाअभावी ते बंद पडले. अखेर जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती समजली व त्यांनी ताराच्या घरी जाऊन शौचालय बांधण्यासाठी मदत दिली. पहिल्या टप्प्यात आम्ही सहा हजार रुपये दिले असून उर्वरित पैसे बांधकाम पूर्ण झाल्यावर देऊ असे स्थानिक अधिका-यांनी सांगितले.
0
श्री पद्मनाभम् मंदिरात ५ पाईपबॉम्ब आढळल्याने खळबळ !

तिरुअंनतपूरम – श्री पद्मनाभम् मंदिरात एका पिशवीत पाच पाईपबाँम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. या मंदिरातील खजिन्याच्या वृत्ताने हे मंदिर काही वर्षापूर्वी चर्चेत आले होते. एक लाख कोटीच्या वर या खजिन्याची किंमत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
पद्मनाभम् मंदिरात रविवारी स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांना हे बॉम्ब आढळून आले. मुख्य मंदिरापासून १०० मीटर अंतरावर हे बॉम्ब एका पिशवीत ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान आता येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत.
0
मदतकार्याचा वेग वाढवा, पंतप्रधानांचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

नवी दिल्ली – नेपाळसह उत्तर भारतात आलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोधमोहीम आणि मदतकार्य वाढवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मदतकार्यात लागलेल्या विविध विभागांनी या बैठकीत त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाची माहिती दिली. भारत आणि नेपाळमध्ये झालेले नुकसान तसेच या ठिकाणी सुरु असलेल्या मदतकार्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच रविवारी आलेल्या भूकंपासंदर्भातील माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
हवाई मार्ग तसेच रस्तामार्गाने मदतकार्याचा वेग वाढवावा, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. भूकंपामुळे अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढा, असे पंतप्रधानांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मदतकार्यात लागलेल्या विविध विभागांमध्ये समन्वय राखला जावा, यावरही मोदी यांनी जोर दिला. भूकंपाचा फटका बसलेल्या ठिकाणी अन्न, पाणी, दूध आणि दूध पावडर तात्काळ पोहोचवावे, असे मोदी यांनी सांगितले.या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीयमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणंत्री मनोहर पर्रिकर तसेच विविध विभागाचे उच्चाधिकारी उपस्थित होते
0
क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड

नागपूर : शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बैरामजी टाऊन सदर येथील एका पॉश फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर शनिवारी पोलिसांनी धाड टाकली. या अड्ड्यावरून पोलिसांनी फ्लॅटचा मालक फिरोज, अजीज अली मो. फलतानी (२८) रा. सिकंदराबाद, दानिश सलीम दमानी (२०) रा. सिकंदराबाद, उमेद गुलाम सदानी (३९) हैदराबाद यांना अटक केली आहे.
या अड्ड्याचे मुख्य सूत्रधार हैदराबादशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी बैरामजी टाऊन साई ललिता अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०७ मध्ये धाड टाकली. तेव्हा फ्लॅटमध्ये क्रिक्रेट सट्ट्याची खायवाडी सुरु होती. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत शनिवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यात सट्टा खायवाडीसाठी मोठ्या प्रमाणावर हैदराबाद येथील सट्टेबाजांची चमू नागपुरात पोहोचली होती.
परंतु योजनेनुसार ठाणेदार रफीक बागवान यांच्या नेतृत्वातील चमूने सायंकाळी ५.१५ वाजता फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत लॅपटॉप आणि मोबाईलवर खायवाडी करतांना आरोपी आढळून आले. पोलिसांनी अड्ड्यातून एक एलईडी टीव्ही, १३ मोबाईल, १ लॅपटॉप, १ सेटटॉप बॉक्स, चॉर्जरसह १ लाख ७ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले.
0
मारहाण केल्याने युवकाची आत्महत्या, गावकºयांची लाडखेड ठाण्यावर धडक

यवतमाळ – मारहाण केल्याने युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी बोरगाव लिंगा येथे घडली. यावेळी आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी युवकाच्या मृतदेहासह लाडखेड पोलिस ठाण्यावर धडक दिली.
विशाल विजय जाधव (२२) रा. बोरगाव लिंगा असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी २५ एप्रिल रोजी सदर युवक घरी असतांना सचिन सुधाकर बोरकर (३५), अंकुश चक्रधर बोरकर यांनी त्याला घरून हर्षा महादेव घोडसर या हीलेच्या घरी नेले. त्यानंतर विष्णु लांडे याच्या शेतात नेऊन सचिन बोरकर, अंकुश बोरकर, प्रविण लांडे, बिपीन विष्णु लांडे, विष्णु लांडे यांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्याने अपमाणित झालेल्या विशालने गावाशेजारी असलेल्या गुणवंत दिवाकर ठोकळ यांचे शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज रविवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईक लाडखेड पोलिस ठाण्यात गेले असता ठाणेदारांनी तक्रार न घेताच त्यांना परत पाठविले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी मृतदेहासह लाडखेड पोलीस ठाण्यावर धडक दिली. जो पर्यंत मारहाण करणाºयाविरूद्घ गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह नेणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी सात जणांविरूद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.
0
जन्मदात्या पित्याकडून ३ मुलींवर बलात्कार

पुणे : कोंढवा पोलिसांचे बीट मार्शल हद्दीमध्ये गस्त घालीत होते… साधारणपणे पंधरा वर्षांची एक मुलगी रस्त्यावर रडत बसलेली त्यांना दिसली… मार्शलवरील दोन्ही पोलिसांनी तिच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली… तिला सोबत घेऊन हे दोघेही पोलीस चौकीत गेले. महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली… त्यानंतर तिने जे काही सांगितले, त्यामुळे पोलीस हादरून गेले…. जन्मदात्या पित्यानेच आपल्यावर बलात्कार केल्याने ही मुलगी ओक्साबोक्शी रडून सांगत होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या नराधम पित्याने त्याच्या आणखी दोन मुलींबाबतही असाच प्रकार केला आहे. विशेष म्हणजे ही घटना मुलींनी आईला सांगूनही तिने गप्प राहण्याचा सल्ला दिला. नवऱ्यावर कोणीतरी करणी केल्याने तो असे वागत असल्याचे तिला वाटत होते.
पिता आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. मूळचं उत्तर प्रदेशातील हे कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात रहायला आलं. कोंढव्यामध्ये चार मुली आणि एका मुलासह हे दाम्पत्य रहात आहे. बाप रिक्षा चालवतो. तर त्याची पत्नी छोटीमोठी कामे करते. पत्नी कामावर गेली, की तो दुपारी जेवणाच्या निमित्ताने घरी यायचा. घरामध्ये एकट्या असलेल्या मुलीसोबत बळजबरी करून तिच्यावर बलात्कार करायचा. त्याच्या सर्वांत मोठ्या २२ वर्षीय मुलीने शुक्रवारी पोलिसांना जबाब दिला. त्यामध्ये आपल्यावरही वडिलांनी चार वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तिचे लग्न लावून दिले.
उत्तर प्रदेशला सासरी नांदत असताना पतीने तिला परत पाठवून दिले. तेव्हापासून ती माहेरी राहते. परंतु ती वडिलांशी बोलत नाही. वडील पुन्हा बलात्कार करतील, या भीतीने ती कायम आईसोबतच राहते. आईसोबतच कामावर जाते. तर धाकट्या १८ वर्षांच्या मुलीवरही त्याने अशाच पद्धतीने बलात्कार केला होता. परंतु तिने जेव्हा आईला हा
प्रकार सांगितला तेव्हा आईने सर्वांना शांत राहण्यास सांगितल्याचे जबाबात म्हटले आहे. वडिलांवर कुणीतरी करणी केली आहे, त्यामुळे ते असे वागतात, असे ती मुलींना सांगत होती.गेल्या आठवड्यात त्याची नजर तिसऱ्या मुलीकडे वळली. दुपारी जेवायला आला असता त्याने तिच्यावरही बलात्कार केला. घरासमोर रडत बसलेल्या या मुलीला पोलीस चौकीत आणल्यावर सर्व बाबींचा खुलासा झाला.पोलिसांनी तिच्या आईलाही बोलावून घेतले. परंतु तिने फिर्याद देण्यास नकार दिला. तसेच मुलीलाही फिर्याद देऊ नको असे सांगितले. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीच स्वत:हून फिर्याद दाखल केली आणि त्याला अटक केली.
0
विजय सामाने यांची आत्महत्या

कोल्हापूर – ‘ख्वाडा’ आणि ‘धग’ या पुरस्कारविजेत्या मराठी चित्रपटांचे तरुण वेशभूषाकार विजय मारुती सामाने (२८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. सामाने यांच्या पश्चात वडील, पत्नी, आठ महिन्यांची मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.
सामाने यांचे देवल क्लबजवळ ड्रेपरीचे दुकान आहे. दुकानाशेजारी असलेल्या डान्स स्कूलमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास चेष्टामस्करीही केली. त्यानंतर ते दुकानात झोपी गेले. दुपारी अडीचच्या सुमारास विद्यार्थ्यांनी विजय यांच्या दुकानाचे शटर उघडले असता, ते गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. विद्यार्थ्यांनी त्यांना सीपीआरमध्ये उपचारास हलविले. पण, उपचारापूर्वीच विजय यांचा मृत्यू झाला. विजय यांनी १०० चित्रपटांत वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘धग’साठी वेशभूषाकार म्हणून स्पर्धेसाठी नामांकन झाले होते. मराठीतील पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ चित्रपटासाठीही वेशभूषाकार म्हणून काम केले होते. यासाठी त्यांना नामांकनही मिळाले होते. सावित्रीच्या लेकी, संभा, बंजारा, राजमाता जिजाऊ, हायकमांड, ढोलकी, मनातल्या उन्हात, चांदी, घरवाली हुशार या चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनाने चित्रपट व नाट्य क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
0
नेपाळमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, मृतांचा आकडा २३००

काठमांडू – नेपाळमध्ये बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भारताची बचावकार्य करणारी टीम नेपाळमध्ये दाखल झाली असून भारतीयांना प्राधान्याने मदत होत आहे. भारत सरकारने या बचाव मोहिमेला ऑपरेशन ‘मैत्री’ असे नाव दिले आहे. तसेच अमेरिकेने नेपाळसाठी १० लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर कॅनडाने नेपाळसाठी पाच दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
नेपाळमध्ये शनिवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास भूकंपाने हाहाकार माजविला आहे. धरणीमाय कोपल्याने मृत्यूचे तांडव नेपाळमध्ये सुरु आहे. उत्तर भारतातही या भूकंपाचा फटका बसला आहे. या ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपातील मृतांची संख्या २३०० वर पोहचल्याचे समजते. अजूनही मोठ्या-मोठ्या इमारतीखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गापुढे सर्वांनीच हात जोडले असून नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी मोकळ्या पटांगणात पूर्ण रात्र जागून काढली आहे.
0
मुद्रा गोहाडने पटकाविले चार पदक

यवतमाळ;दि. २५ – येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतील पाचवीमधील विद्यार्थीनी मुद्रा विनायक गोहाड हीने शैक्षणिक सत्रात चार पदके प्राप्त केली.
शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षात मुद्रा गोहाड हीने विविध परिक्षेत्र घवघवित यश संपादन करून पदके पटकाविली. सिल्व्हर झोन फाऊंडेशन दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल आॅलिम्पीयाड आॅफ इंग्लिश, इंटरनॅशनल आलिम्पियाड आॅफ सायन्स या परिक्षांमध्ये सिल्व्हर मेडल मिळविले आहे. तर राष्टÑभाषा प्रचार समिती वर्धाद्वारे घेण्यात आलेल्या राष्टÑभाषा प्राथमिक परीक्षेत्र शळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. तीच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
0
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ टाटा नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ड्रायवरने चलाखी दाखवत वेळ असतानाच गाडी रोडच्या बाजुला उभी केली. त्यामुळे या घटनेत कुठलिही जिवीतहानी झाली नाही. मात्र, अचानक नॅनो कारच्या इंजिनकडील भागाने पेट घेतल्याचे ड्रायव्हरकडून सांगण्यात आले. त्यामुळे नॅनो कारबद्दल पुन्हा एकदा भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे.
आमगाव रोडवरील अदासी फाट्याजवळ पांढऱ्या रंगाची नॅनो कार प्रवास करत होती. मात्र, नॅनोच्या इंजिनकडील भागाने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली आहे. गाडीने पेट घेतल्याने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या बाजूला लावत अलगदपणे स्वत:ला गाडीतून बाहेर काढले. दरम्यान नॅनो कारने अचानक पेट घेण्याच्या घटनांमुळे नॅनो कारबद्दलचे ग्राहकांचे आकर्षण कमी झाले होते. गरिबांचा सफारी असलेल्या नॅनोच्या सुरक्षिततेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, या प्रकरणाची दखल घेत टाटा कंपनीने नॅनो कारमध्ये विशिष्ट सुधारणा केली. तसेच लाखो ग्राहकांना विशिष्ट कालावधीत घेण्यात आलेल्या नॅनो कारच्या इंजिनमध्ये बदलही करुन दिला. तर काहींना पूर्णपणे नवीन गाड्या देण्यात आल्या. त्यामुळे नॅनोबद्दलची विश्वासर्हता पुन्हा एकदा सामान्य लोकांच्या मनात रुजत आहे. पण, गोंदियात नॅनो कारने पुन्हा पेट घेतल्याने नॅनो कार वापरण्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.
0
नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के

नागपूर – उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असून काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्ट्रातील विदर्भात जाणवले आहे. उपराजधानी नागपूर शहरही भूकंपाच्या आवाजाने हादरले. त्यामुळे नागरिकांनी सर्वत्र चर्चा सुरु केली असून हे भूकंपाचेच धक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तर भारतील बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथे ७.५ रिस्टर स्केलचा तीव्र भूकंपाचा झटका बसल्याने देशभरात एकच धांदल उडाली आहे. सुरुवातीला जमिन हादरुन गूढ आवाज झाला. त्यामुळे नागिराकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाच्या आवाजाने नागरिक घर आणि ऑफिसमधून सैरा-वैरा पळत मोकळ्या जागी येऊन स्वत:चा बचाव करत होते. जवळपास दीड मिनिटे हा भूकंपाचा थरार नागरिकांनी अनुभवला. नेपाळ हे भूकंपाचा केंद्रबिंदू मानण्यात येत असून महाराष्ट्रातील विदर्भातही भूकंपाचा सौम्य हादरा बसला आहे. दरम्यान भूंकपाच्या धक्क्यांनंतर लातुरमधील किल्लारी भूकंपाच्या आठवणी ताज्या करत नागरिकांत चर्चाच-चर्चा सुरु झाली आहे.
0
भूकंपाने उत्तर भारत हादरला , ४ ठार, इमारती कोसळल्या

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारत आज (शनिवारी) दुपारी पावणे बाराच्या सुमारास भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला. साधारण दीड ते दोन मिनिटे भूकंपाची धक्के जाणवले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नागपुरसह मुंबईत अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 7.4 इतकी या भूकंपाची तीव्रता असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.भूकंपात ४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे
नेपाळची राजधानी काठमांडूपासून 83 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्र आहे. काठमांडूमध्ये काही भागात इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. नेपाळच्या इतिहासात हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे बोलले जात आहे. काठमांडूमध्ये फोन सेवा ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान, बांगलादेशातीही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, सिक्कीम, पंजाब, गुजरातमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. साधारण दीड ते दोन मिनिटे एकापाठोपाठ भूकंपाचे अनेक धक्के जाणवले.नेपाळमध्ये आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास हाहाकार माजविला आहे. ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात ४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अनेक मोठ्या इमारती कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
0
लाचखोर अन्न सुरक्षा अधिकारी एसीबीच्या जाळ््यात

यवतमाळ, दि. २० – खाद्य तेलाचे व मिरचीचे सॅम्पल पास करून देण्यासाठी ५१ हजार रुपये लाच स्विकारणाºया अन्न सुरक्षा अधिकाºयास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज सोमवारी दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्ताच्या कार्यालय ही कारवाई केली आहे.
प्रभाकर निवृत्ती काळे (४२) असे लाचखोर कर्मचाºयाचे नाव आहे. येथील अन्न व औषध प्रशासन विभागात ते अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. आर्णी येथील एका बार अॅन्ड रेस्टॉरंट मधील खाद्य तेलाचे व मिरचीचे घेतलेले सॅम्पल पास करून देतो. त्यासाठी ५१ हजार रुपये लाचेची मागणी या कर्मचाºयांने तक्रारदाराकडे केली होती. तसेच आर्णीतील इतर सात बार अॅड रेस्टॉरंट मालक तुझे चांगले परिचयाचे असल्याने त्यांच्याकडून वार्षिक हप्त्याचे पैसे जमा करून घेऊन ये असे फर्मान सोडले होते. नाही तर तुला याचा त्रास होईल अशी तंबीही दिली होती. या प्रकरणी बार अॅड रेस्टॉरंट मालकाने यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून पथकाने स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात सापळा रचला होता. दरम्यान पंचासमक्ष ५१ हजार रुपये लाच स्विकारताना काळे यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामनकर, गिरी, इंगोले, अमित जोशी, अनिल राजकुमार, खेडकर, ढोणे, महल्ले, शेंडे, मेश्राम, चिरडे, कोकेवार यांनी केली.










