यवतमाळ : महाराष्ट्र शासनाने आणलेला जादुटोणाविरोधी कायदा हा सर्वसमावेश आणि सर्वच प्रकारच्या अघोरी प्रथा तसेच जादुटोण्यांवर प्रतिबंध घालणारा आहे. इतका व्यापक आणि मोठा कायदा देशात अन्य कोणत्याही राज्यात नाही. हा कायदा देव धर्माच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासोबतच वाईट चालीरितींना प्रतिबंध घालेल, असे प्रतिपादन शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष तथा अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.शाम मानव यांनी केले. कायद्याच्या जनजागृतीसाठी प्रा.मानव यांचे आझाद मैदान येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.काशिनाथ लाहोरे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, सुरेश जुरमुरे आदी उपस्थित होते.
जादुटोणाविरोधी कायद्यात देव, धर्माला विरोध नाही तसेच कोणत्याही धार्मीक कृत्याच्या आड कायदा येणार नाही. परंतु देव, धर्माच्या नावावर कुणी दुकानदारी थाटल्यास मात्र कायद्याने तो दोषी ठरेल. या कायद्याबाबत सुरूवातीस फार गैरसमज पसरविण्यात आला. कायदा संमत होण्यासाठी पुर्वीच त्याची जनजागृती आम्ही केली. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरीकांना वाईट प्रथांपासून सुटका देणारा हा कायदा असल्याने हा कायदा येऊ शकला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या कायद्यातील तरतुदी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहीजे, असे सांगितले. कुणी जादुटोणा, वाईट प्रथा-परंपरांच्या नावाखाली फसवणूक करीत असल्यास यातील तरतूदीनुसार आपण त्याविरूध्द पोलिसांकडे तक्रार नोंदविली पाहिजे. आजच्या आधुनिक युगातही जादुटोण्याच्यानावाखाली फसवणूक करीत आहे, ही सामाजिक न्यायाच्या प्रक्रीयेतील फार मोठा अडसर असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी बाबा-बूवा हातचलाखीने तसेच धर्म, देवाच्या नावाखाली कसे फसवितात याची प्रात्यक्षिकेही करून दाखविली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उद्घाटनिय भाषण केले. प्रा.काशिनाथ लाहोरे, विजय साळवे, सुरेश जुरमुरे यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन विलास काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.कमल राठोड, देविदास शंभरकर, वरिष्ठ समाजकल्याण निरिक्षक जी.बी.धोटे, डी.एम.चव्हाण, गौरव गावंडे आदींनी सहकार्य केले.










