अटलबिहारी वाजपेयींना ‘भारतरत्न’ प्रदान

Bharat-Ratna
नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वाजपेयींना शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी मान्यवरही उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी एक मंडप उभारण्यात आले होते. येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. प्रसिद्धीमाध्यमांना कार्यक्रम स्थळापासून दूर ठेवण्यात आले होते.
अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्याची घोषणा गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी करण्यात आली होती. तेव्हा ते फक्त थोडेसे हसले होते. परंतू दोन दिवसांपूर्वी जेव्हा राष्ट्रपती स्वतः घरी येऊन त्यांचा हा सन्मान करणार आहेत, असे सांगितले तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अटलजी गेल्या काही वर्षांपासून आजारी आहेत. त्यांना अल्झायमर डिमेंशिया झाला आहे.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करताना वाजपेयींनी दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. १९९६ मध्ये आलेले त्यांचे सरकार फक्त तेरा दिवस टिकले. त्यानंतर १९९८ मध्ये देशातील जनतेने पुन्हा एकदा वाजपेयींना संधी दिली. त्यांच्या या सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 9 = seventy two