यवतमाळ – अतिक्रमणाने वेढलेल्या शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ केला आहे. आज शनिवारी आर्णी मार्गावरील तब्बल अडीचशे दुकानांनवर बुलडोजर चालविण्यात आला. यावेळी व्यवसायिकांनी उपासमारीचा प्रश्न उपस्थित करीत अतिक्रमण हटविण्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
शहारातील चौका – चौकात व्यवसायिकांनी दुकाने थाटल्याने रहदारीचा व वाहतुकीचा प्रश्न गंभिर झाला आहे. गेल्या दोन वर्षात नगर पालिके ने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ठोस कारवाई न केल्याने या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले. नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेसह रस्त्यावर व्यवसायीकांनी व्यवसाय मांडल्याने नागरीकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. अतिक्रमणामुळे शहराचा चेहरा देखील विद्रुप झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याची मागणी जनतेमधून होत होती. दरम्यान नवीन वर्षात अतिक्रमण हटविण्याचा मुहूर्त नगर पालिकेला सापडला. आज शनिवारी आर्णी मार्गावरील पानटपºया, चहाकॅटीनसह किरकोळ व्यवसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना, व्यवसायीकांनी याला विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात अधिकाºयांना अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागली. आज पासून प्रारंभ झालेली अतिक्रमण हटाव मोहिम १५ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्यादिवशी वडगाव ग्रामपंचायत हद्दीपासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत आर्णी नाक्यावरील पोलीस चौकीपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले होते. या मोहिमेत नगर पालिकेचे मुख्याधिकारी, दीपककुमार मिना, रविंद्र पांढरे, उपविभागिय अधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार अनूप खांडे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुठलिही अनुचित घटना घडू नये म्हणून मुख्य मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









