
दिग्रस,दि. २ (किशोर कांबळे ) – खेळण्याबागळण्याच्या दिवसात आईने दुसरे लग्न केल्यानंतर आपल्या मुलाला सोबत घेऊन जाते. आईसोबतच मुलाचे नावही तेथे बदलविण्यात येते. तब्बल ३९ वर्ष झाल्यानंतर त्याला एक दिवस आपल्या खºया वडीलाचे नाव माहित झाले. त्यानंतर आपल्या नावासमोर वडीलांचे नाव लागावे म्हणून दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायालयाने सदर व्यक्तीला त्याच्या खºया वडीलाचे नाव द्यावे असा निर्वाळा दिल्याने अखेर मुरलीचा ‘विकास’ होऊन त्याला ४० वर्षाने वडीलाचे नाव मिळाले. मुरलीधर थावरा पवार रा. सेवानगर या इसमाला आता वडील नरसिंग चव्हाण यांचे नाव मिळाले.
मुरलीधरची आई कौसल्याबाई या महिलेचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पतीचे नाव नरसिंग मोहनसिंग चव्हाण तर थावरा पवार असे दुसºया पतीचे नाव आहे. या महिलेचे थावरा पवार याच्यासोबत वास्तव्य करीत आहे. मुरलीधर हा एक वर्षाचा असताना त्याच्या आईने दुसरे लग्न करून त्यालाही सोबत नेले होते. दरम्यान शाळेत नाव टाकतांना मुरलीधरचे वडील म्हणून थावरा पवार यांच्या नावाची नोंद करण्यात आली. दरम्यान १४ जानेवारी २०१४ रोजी तिळसंक्रांतीच्या दिवशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने थावरा याने तू माझा मुलगा नसल्याचे मुरलीधरला म्हटले. त्यावर मग माझा बाप कोण या बाबतच विचारणा केली असता नरसिंग मोहनसिंग चव्हाण रा. रोहडा ता. पुसद हा असल्याचे सांगितले. त्यावरून मुरलीधर पवार याने दिग्रस येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल करून माझे खरे वडील नरसिंग चव्हाण यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. दिवाणी न्यायाधिश (कनिष्ट स्तर) एन.के. वाळके यांच्या न्यायालयात याप्रकरणातील दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण घेतली. यामध्ये मुरलीधर हा नरसिंग चव्हाण व कौसल्याबाई यांचा मुलगा असून त्याचे जन्मनाव विकास असल्याचे उघड झाले. त्यावरून न्यायालयाने मुरलीधर याचे नाव विकास नरसिंग चव्हाण असल्याचे जाहिर केले. या निकालाने मुरलीधर (विकास) याला ४० वर्षानंतर खºया वडीलाचे नाव मिळाले आहे. मुरलीधरच्या बाजूने अॅड. गिरीष दळवी यांनी काम पाहिले. (साभार दै. पुण्य नगरी)









