
यवतमाळ दि. ५ – वणी येथील वणी-घुगूस मार्गावर मंदर शिवारातील पुलाजवळ उकणी येथील युवकाचा दुचाकीसह मृतदेह आढळून आला होता़ पोलीस तपासामध्ये ‘त्या’ युवकाचा अपघात नसून अनैतिक सबंधातून खून झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी महिलेसह तीन आरोपींना आज ५ मार्च रोजी अटक केली.
प्रशांत चिंतामण रणदिवे (३१) रा. उकणी असे मृतकाचे नाव असून निळापूर येथील आरोपी अनिल बोढाले सोबत मैत्रीचे संबंध होते़ हे दोघे महाविद्यालयीन शिक्षणापासून एकमेकाचे मित्र असल्याने त्यांचे घरी येणे-जाणे होते़ त्यातच मृतकाचे अनिलची पत्नी पुजा सोबत प्रेमसंबंध जुळले़ या अनैतिक प्रेमसंबंधामुळे गत एक महिन्यापूर्वी त्यांच्यात वाद निर्माण झाला होता़ याचा वचपा काढण्याकरीता सहकारी वामन पाचभाई रा़शेलू व विनोद मारोती मिलमिले यांनी संगनमताने दि़२२ फेब्रुवारीला मृतकास घरी जेवण्याकरीता बोलाविले़ मृतक हा आपल्या पत्नीला बाहेर जेवण करायला जात असल्याचे सांगून निळापूर येथील आरोपी अनिल याच्या घरी गेला़ यावेळी अनैतीक संबंधावरुन वाद उत्पन्न झाला असता आरोपींनी हातोड्याने मृतकाच्या डोक्यावर सपासप वार केले़ तसेच त्याच्या गुप्तांगावरही घाव करण्यात आल्याने अनिलचा आरोपीच्या घरीच मृत्यू झाला़ तसेच मृतकाला त्याच्याच दुचाकीवर बसवून घुगूस मार्गावरील पुलाजवळ टाकून अपघाताचा देखावा निर्माण केला़ या बाबत येथील ठाणेदार असलम खान व गुन्हेशोध पथकाने आरोपी व मृतकाचे मोबाईलचे टॉवर लोकेशन व कॉल डिटेल्स मिळवून भक्कम पुरवे गोळा करून त्या दृष्टीने तपासकार्य चालविले़ ५मार्च रोजी मुख्य आरोपी अनिल बोढाले, पुजा अनिल बोढाले हे दोघे रा़निळापूर, वामन पाचभाई रा़शेलू, विनोद मिलमिले रा़विरकुंड यांना अटक करण्यात आली़ त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून न्यायालयात हजर केले असता दि़८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे़
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकार, एलसीबीचे अधिकारी पुजलवार यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार असलम खान, पो़लीस उपनिरीक्षक कवडू चांदेकर, दिलीप सायरे, प्रज्ञा वाडेकर, डिबी पथकाचे जमा. अरुण नाकतोडे, गोपाल वास्टर, साजिद सय्यद, विकास खडसे, प्रमोद जूनूनकर, सुधिर पांडे, शेख नफिस, आनंद अलचेवार, वाहन चालक प्रमोद जिड्डेवार यांनी परिश्रम घेतले़









