
नवी दिल्ली – तीन दिवसीय भारत दौ-याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नवी दिल्लीच्या सिरी फोर्ट सभागृहात भाषण केले. नमस्ते, बहुत धन्यवाद या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत ओबामांनी उपस्थित भारतीयांची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.
जात, धर्म, वर्ण, महिला सशक्तीकरण आणि भारत-अमेरिका संबंध या सर्व मुद्यांवर ओबामांनी आपले विचार मांडले. अमेरिका भारताचा सर्वात चांगला मित्र बून शकतो. भारत-अमेरिका एकत्र आले तर जग अधिक सुरक्षित होईल असे ओबामा म्हणाले. दोन्ही देशांनी दहशतवादाची झळ सोसली असून, दोघांसमोरही आता नवी आव्हाने आहेत.
भारत-अमेरिकेमधील नागरी अणूऊर्जा करारातील अडथळे दूर करुन, आता आपण अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे त्यामुळे भारतीयांची वीजेची गरज पूर्ण होऊ शकेल असे ओबामांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आता सुधारणा होणे आवश्यक असून, सुरक्षा परिषदेवर भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे यासाठी आपण शिफारस करणार आहोत असे ओबामा यांनी जाहीर करताच सभागृहात टाळयांचा एकच कडकडाट झाला. भारत-अमेरिका वेगवेगळया क्षेत्रात एकत्र काम करु शकतात. भारत-अमेरिका जे आजार रोखता येऊ शकतात अशा लसींची एकत्र निर्मिती करुन, बालमृत्यू रोखण्यामध्ये महत्वपूर्ण काम करु शकतात.
अलीकडच्या काहीवर्षांमध्ये अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक गरीबी निर्मूलन झाल्याचे ओबामांनी सांगितले. ओबामांनी आपल्या भाषणात स्त्री सबलीकरणावरही जोर दिला. प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्य दलातील संचलनाचे महिलांनी जे नेतृत्व केले त्याचे ओबामांनी कौतुक केले. मुला इतकी प्रत्येकी मुलगीदेखील महत्वाची आहे. मुली यशस्वी होतात तेव्हाच देश यशस्वी होतो असे ओबामा म्हणाले.
जात, धर्म, पंथ आणि वर्ण यामध्ये न अडकता मानवतेला महत्व देण्याचा सल्ला त्यांनी दिली. अमेरिकेत माझ्या आयुष्यातही असे काही क्षण आले जिथे आपल्या रंगामुळे वेगळी वागणूक मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. शाहरुख खान, मेरी कोम, मिल्खा सिंग यांचा धर्म, रंग न पाहता त्यांचे यश सर्व भारतीयांनी सारखेपणानेच साजरे करावे असे ओबामा म्हणाले.









