
महाराष्ट्रातील काही ठिकाणीही या तंत्रज्ञानाद्वारे जनावरांसाठी पोषक चार्याचे उत्पादन घेतले जाते.?लंडन : अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मातीशिवाय केवळ पाण्यावर स्ट्रॉबेरी उत्पादनाचा महाप्रकल्प ब्रिटनमधील शेतकर्यांनी यशस्वी करून दाखविला असून, या प्रकल्पातून आतापर्यंत तब्बल ७५ हजार टन स्ट्रॉबेरीचे उत्पादनही घेण्यात आले आहे.
जमिनीवर उत्पादन घेण्याच्या पारंपरिक पद्धतीत मजुरांना खाली वाकून स्ट्रॉबेरीची तोडणी करावी लागते. यामुळे त्यांना पाठदुखी व अंगदुखीसारखा त्रास होतो. यावर हा अनोखा उपाय शोधत जवळपास पाच फूट उंचीवर लटकाविलेल्या ट्रेमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन या शेतकर्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. विशेष म्हणजे यासाठी मातीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. विशालकाय ट्रेमधील पाण्यावरच या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात आले आहे. पिकाला पाण्याद्वारेच अन्नद्रव्यांचा पुरवठा करून शेतकर्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मजुरांना उभ्यानेच स्ट्रॉबेरीची तोडणी करता येते. शिवाय पिकाच्या गरजेनुसार हवामानही या प्रकल्पात नियंत्रित केले जाते. ब्रिटनच्या ससेक्स प्रांतात १६ एकरावर उभारण्यात आलेल्या या महाकाय प्रकल्पातून स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन सध्या घेतले जात आहे. पाण्यावर पीक उत्पादन घेण्याच्या या तंत्रज्ञानास हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.









