
नवी दिल्ली – मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केवळ उद्योगपतींच्या फायद्याचा आहे. पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली हे जमा-खर्च आणि समानतेचे गणित सोडवण्यात अपयशी ठरले आहेत, अशी जोरदार टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.
या अर्थसंकल्पात केवळ उद्योगपतींना फायदा देण्यात आला आहे. तर ३.५ कोटी प्राप्तिकरदात्यांना थोडक्यात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र सेवा कराचा बोजा वाढल्याने त्यात ते पिचणार आहेत, असेही चिदंबरम म्हणाले. सरकारने वित्तीय तूट कपात करण्याचे लक्ष ठेवले आहे. ही तूट ३.९ वरून ३.६ टक्के आणण्यात येणार आहे. याचाच अर्थ सरकारला ३७,५०० कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.









