अल-कायद्याच्या दोन जिहादींना जॉर्डनमध्ये फाशी

अम्मन, जॉर्डन – जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळल्याचा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी अल-कायद्याच्या दोन जिहादी कैद्यांना फाशी दिल्याची माहिती जॉर्डनच्या सरकारी प्रवक्त्यांनी दिली आहे.

जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या साजिदा –अल-रिश्वी आणि झैद-अल-कर्बोली या दोन जिहादींना बुधवारी सकाळी फाशी देण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले. २००५ मध्ये झालेल्या अम्मन येथील तीन हॉटेल्समध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी रिश्वीला जॉर्डन सरकारने ताब्यात घेतले होते.

गेल्या वर्षी २६ डिसेंबरमध्ये जॉर्डनचा वैमानिक मोएथ-अल-कसाबेहच्या विमानाला पूर्व सिरियाच्या भागात अपघात झाला होता. त्यानंतर इसिसने मोएथला बंदी बनवले होते. या वैमानिकाला पिंज-यात ठेवून जिवंत जाळण्यात आल्याचा व्हिडीओ मंगळवारी इसिसकडून प्रसारित करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये वैमानिक केशरी रंगाचे कपडे घालून पिंज-यात बंद असलेला दिसत आहे आणि पिंज-याच्या चारही बाजूंनी आग लावण्यात आली आहे. २२ मिनिटांचा हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून प्रसारित कऱण्यात आला आहे.

इसिसने वैमानिकाची निघृणपणे हत्या केल्यानंतर जॉर्डन सरकारने अल-कायद्याच्या दोन जिहादींना फासावर लटकवले आहे. इसिसचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर काही तासांमध्येच जॉर्डनने इसिसच्या दोन जिहादींना फाशी देत इसिसला जशास तसे उत्तर दिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine + = 11