
माहूर (नांदेड), दि. १५ – महाशिवरात्री निमित्त पुजेसाठी गणेरीचे फुल आणण्यासाठी गेलेल्या वृद्ध इसमावर दोन अस्वलानी हल्ला चडविल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. माहूर तालुक्यातील तांदळा शिवरात दुपारी ही घटना घडली.
कान्हु देव्हारे (६०) असे जखमीचे नाव आहे. महाशिवरात्री असल्याने पुजेसाठी गणेरीचे फुले आणण्यासाठी लगतच्या तांदळा शिवारातील शिवमंदिर शेजारी आज दुपारी गेला असता त्याच्यावर अचानक नर, मादी असलेल्या जोडीने हल्ला चढविला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांना माहूर ग्रामीण रुग्णालयात आणले तेथे वैद्यकीय अधिकारी नीरज कुंभारे यांनी प्रथम उपचार करून यवतमाळ येथे अधीक उपचारासाठी पाठविण्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. तरोडे यांनी रुग्णालयात भेट देऊन पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली. यावेळी वनपाल एम.एन. देशमुख, वनरक्षक ए. आर. जाधव, एम. बी. राठोड, एस. आर. देशमुख, सेवक सैय्यद रियाजोद्दीन यांची उपस्थिती होती. शेतमजूर पांडुरंग देव्हारे यांची परिस्थिती हलाकीची असल्याने गावातील संतोष अग्रवाल, संजय राठोड, गौतम बिल्लारे, बाळ देव्हारे, विनोद खुपसे, जीवन अग्रवाल, सय्यद इसाक, सय्यद फते महंमद यांनी मदतीचा हात पुढे केला.









