यवतमाळ – पाटणबोरी येथून तीन किमी अंतरावर महाराष्टÑ-आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय चेकपोस्टवर जमा झालेली सहा लाख रूपयांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना वाहन अडून दोन युवकांनी लुटल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली.
पाटणबोरीनजीक पिंपळखुटी येथे महाराष्टÑ शासनाचा अत्याधुनिक चेकपोस्ट नाका आहे. तो सद्भाव कंपनीमार्फत चालविला जातो. या चेकपोस्टवर प्रत्येक वाहनचालकाकडून ९० रूपये व अधिक सेवाशुल्क आकारले जाते. तसेच ओव्हरलोड वाहनांकडून दंडही आकरण्यात येतो. येथे दररोज दीड ते पाऊणे दोन लाख रुपये रक्कम जमा होते. ही रक्कम सद्भाव कंपनीचा व्यक्ती दररोज यवतमाळ येथे जाऊन आयसीआयसीआय बँकेत भरणा करतो.
आज मंगळवारीसुद्धा नेहमीप्रमाणे सकाळी १०.१५ वाजता कंपनीतील प्रवीण राऊत (वय २२) रा. यवतमाळ हा युवक ५ लाख ६५ हजार रूपयांची रोकड घेवून यवतमाळला निघाला. चेकपोस्टवरून एका स्कुटीवर तो पाटणबोरी येथे आला. पाटणबोरी येथे आल्यानंतर तेलंगणा बंदमुळे त्याला आंध्रची बस मिळाली नाही. पाटणबोरीकडून पांढरकवड्याकडे जाणाºया एका दोन दुचाकीस्वारांनी त्याला आपल्या वाहनावर घेतले. ढोकीच्या अलीकडे एका बंद ढाब्यामागे सदर युवकांनी गाडी भरधाव वेगाने नेऊन थांबविली. एका युवकाने त्याची बॅग हिसकावली व एकाने त्याला दगडाने डोळ्याजवळ दुखापत केली. प्रवीणला मारहाण करून दोन्ही युवक पांढरकवड्याकडे स्प्लेंडर दुचाकीने पसार झाले. सदर दोन्ही युवक ३० वर्ष वयाचे आहेत. बॅगमध्ये संपूर्ण १०० रुपयांच्या नोटा मिळून ५.६५ लाख रुपये होते. या घटनेची तक्रार पांढरकवडा पोलिस ठाण्यात दिली असून अज्ञात आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला.









