
पुणे- पाळण्यातून पडू नये म्हणून सुरक्षेसाठी बांधलेली ओढणीच अवघ्या अकरा महिन्यांच्या चिमुरडीच्या जिवावर बेतली. झोपेत चुकून या ओढणीचा चिमुरडीच्या गळ्याला फास लागल्याने तिचा मृत्यू झाला. चिखलीतील जाधववाडी येथे रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सौम्या महेश तळोले असे या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. मे महिन्यात तिचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौम्याच्या आईने सौम्याला आंघोळ घालून पाळण्यात झोपवले होते. नेहमीप्रमाणे झोपेत उसळी मारल्यानंतर सौम्या पाळण्यातून खाली पडू नये यासाठी सौम्याला पाळण्यात ओढणीने बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, झोपेतच ती खाली सरकत गेली आणि त्यामुळे सौम्याच्या गळ्याला ओढणीचा फास लागला. ओढणीने फास लागलेल्या अवस्थेतच सौम्या पाळण्यातून लटकत असलेल्या अवस्थेत ती घरच्यांना आढळून आली.









