आज पन्नास वर्षांनी …

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले .

ठेचाळलास रक्ताळलास कधी निर्भर्त्सना
सहन केलीस
तरीही तू पुढेच चाललास
पाठीमागे उधाणलेला समुद्र .

तुझ्या आवाजात आवाज मिळविणाऱ्या बेफाम लाटा
तुला झेलणाऱ्या कुरवाळणाऱ्या ‘
अशाही लाटा आल्या : तुला गिळू गिळू म्हणणाऱ्या
पण तू तर त्यांनाच गिळलस.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
यु झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत .

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्या गुलामांच्या पायातल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्दच असे की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात
तुझा संघर्षच असा की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत

ओरबाडलास भूतकाळ , शिलगावलीस मने
मुक्त केलीस हिसकावलेली शस्त्र अन पुकारलेस युद्ध
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश : डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा
ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी : तेही थंड झालंय
आणि तू , तू पेटवतोयस मला
आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे .

ज. वि .पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 − five =