
नवी दिल्ली – येत्या १५ ते २० दिवसांमध्ये बिहार, पंजाब आणि आसाम या राज्यांसह सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
सध्या बिहार, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या राज्यपालांची पदे रिक्त आहेत. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील येत्या २१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल उर्मिला सिंग यांचा २४ जानेवारीला पाच वर्षांचा कार्यकाल संपत आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे सध्या बिहार आणि मेघालय या राज्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर नागालँडचे राज्यपाल पी.बी. आचार्य नागालँडसह आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल के.रोसैह आणि ओडिशाचे राज्यपाल एस.सी. जामीर पुढील काही महिन्यांत निवृत्त होत आहेत. या दोनही राज्यपालांची निवृत्ती संपुआ सरकारच्या काळात नियुक्ती करण्यात आली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर संपुआ सरकारच्या काळात नियुक्त कऱण्यात आलेल्या अनेक राज्यापालांनी राजीनामे दिले होते. एनडीए सत्तेत आल्यानंतर शीला दिक्षित(केरळ), एम.के नारायणन(प.बंगाल), अश्वनी कुमार(नागालँड), बी.एल.जोशी(उत्तर प्रदेश), बी.व्ही.वांछू(गोवा), शेखर दत्त(छत्तीसगड) आणि व्ही.के.दुग्गल(मणिपूर) यांनी राजीनामे दिले होते. मिझोरमचे राज्यपाल व्ही. पुरुषोत्तम यांची नागालँडला बदली केल्यानंतर राजीनामा दिला होता तर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मिझोरमला बदली केल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.









