
यवतमाळ , दि. ९ (प्रतिनिधी) – शहरालगत भोसा येथे महीलेने आपल्या एक वर्षीय चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली. अर्चना शांताराम राऊत (२८), निधी शांताराम राऊत (१) रा. भोसा अशी मृत मायलेकीची नावे आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील अर्चनाचा विवाह दोन वर्षापूर्वी अकोला बाजार येथील शांताराम सोबत झाला होता. लग्नानंतर ते शहरालगत भोसा येथे भाड्याने खोली करून राहत होते. दरम्यान तीचा पती शांताराम हा काल सोमवारी भिसीचे पैसे आणण्यासाठी बाहेरगावी गेला होता. आज सकाळी तो भोसा येथे परत येताच पत्नी व मुलगी घरी दिसली नाही. त्यामुळे त्याने शोधाशोध सुरू केली असता त्याच भागातील विहीरीत अर्चना व निधीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, वडगाव रोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग मिरासे, पोलीस उपनिरीक्षक उमेश नासरे यानी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या महीलेने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.









