आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण सर्वोच्च न्यायालयात

546c800a3f00b
नवी दिल्ली – आदर्श गृहनिर्माण सोसाय़टी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आदर्श घोटाळयातील आरोपींच्या यादीतून नाव वगळण्याची त्यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राज्यापालांनी अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाईला परवानगी नाकारल्यानंतर आदर्शमध्ये दाखल झालेल्या आरोपपत्रातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.
त्यानंतर खुद्द अशोक चव्हाण यांनी डिसेंबरमध्ये या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांचीही याचिका फेटाळून लावली.
अशोक चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २४ एप्रिलला सुनावणी होणार आहे. देशाच्या राजकारणात गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळयामुळे अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 × four =