मुंबई : राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा हा उपक्रम नाविन्यपूर्ण असून जनतेच्या सेवेसाठी विनाशुल्क असणारा लोकाभिमुख व क्रांतीकारी उपक्रम आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आरोग्य विभागातर्फे आज पासून आपत्कालीन वैद्यकीय सेवांतर्गत 937 अत्याधुनिक रुग्णवाहिका राज्यभरात सुरु करण्यात आल्या असून या रुग्णवाहिकांना मुख्यमंत्री श्री.चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते शनिवारी हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. येथील मरीन लाईन्स येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपत्कालीन वैद्यकीय सेवाही भारतातील पहिली अत्याधुनिक आरोग्य सेवा असून या उपक्रमातील रुग्णवाहिका जागतिक दर्जाच्या आहेत. या सेवेत प्रशिक्षित डॉक्टर, ॲटोमॅटीक व्हेहिकल लोकेशन टेक्नॉलॉजी (इव्हीएलटी) उपकरणांचा समावेश आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, जीवन अमृत योजनांच्या पाठोपाठ राज्यातील जनतेला आरोग्य क्षेत्रातील अजून एका अभिनव योजनेची आम्ही भेट देत आहोत. आपत्कालीन परिस्थितीत 108 क्रमांक फिरविल्यास 20 ते 30 मिनिटात सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होऊन रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होणार आहे, असेही श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले. आरोग्य मंत्री म्हणाले, राज्य शासनाने सामान्यांच्या सेवेसाठी अजून एक अभूतपूर्व योजना अंमलात आणली आहे. गंभीर आजारात आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय सेवेची उपलब्धता या योजनेमुळे होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत शहरी भागात केवळ 20 मिनिटात तर ग्रामीण भागात 30 मिनिटांपर्यंत ही सेवा रुग्णांपर्यंत पोहोचणार आहे, या सेवेसाठी पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटर कार्यरत असून त्याद्वारे रुग्णवाहिकांना संदेश देण्यात येतो, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मरीन लाईन्स येथे झालेल्या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुमारे 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवून या रुग्णवाहिका राज्यभरात पाठविण्यात आल्या. ढोल-ताशे, तुतारीच्या निनादात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री श्री.चव्हाण, आरोग्यमंत्री श्री.शेट्टी, आरोग्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांनी यावेळी रुग्णवाहिकांची पाहणी केली. कार्यक्रमास खासदार प्रिया दत्त, मुख्य सचिव जे.एस.सहारिया, माजी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठीया, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सुजाता सौनिक, सचिव श्रीमती मीना लोचन, ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.गोविंद राज आदींसह मान्यवर उपस्थित होते.










