‘आप’मध्येही तिकिटांची सौदेबाजी

aap-logo
नवी दिल्ली – आम आदमी पक्षातही तिकीटांची खरेदी-विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले असून तिकीटासाठी पैसे मागणाऱ्या दोन नेत्यांची पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पैशांसाठी तिकीट मागणाऱ्या अरुणा सिंह आणि अशोक यांची पक्षातून हकालपट्टी केली जात असल्याचे सांगितले. सिंह या ‘आप’च्या अवध विभागाच्या संयोजक आहेत तर अशोक हे हरदोईचे कोषाध्यक्ष आहेत. या दोघांविरुद्ध लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार पक्षाकडे करण्यात आली होती. पक्षाने केलेल्या चौकशीत दोघेही दोषी आढळल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ‘असे प्रकार पुन्हा घडल्यास त्याची गय केली जाणार नाही. कोणाबाबत अशी तक्रार आल्यास त्या उमेदवाराचे तिकीट रद्द करण्यात येईल’, असे केजरीवाल म्हणाले.
राखी बिडलान यांच्यावरील आरोप निराधार
राखी बिडलान यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हे आरोप केजरीवाल यांनी फेटाळले. राखी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही, असे केजरीवाल म्हणाले. अन्य आमदारांना लोकसभा उनेदवारी नाकारण्यात आली असताना राखी यांना पुन्हा का उमेदवारी देण्यात आली, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता चांगल्या उमेदवार असल्याने त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 1 = three