
सांगली- महाराष्ट्राला आबा म्हणून परिचित असलेले आणि सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांना मंगळवारी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. अंजनी येथील हेलिपॅड मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुपारी दोनच्या सुमारास रोहित, स्मिता आणि सुप्रिया या त्यांच्या तीन मुलांनी आर. आर. पाटील यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरीकांची मोठी गर्दी उसळली होती.
आबांच्या अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, नारायण राणे आदी नेतेमंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही याप्रसंगी उपस्थित होते. यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. हजारोंचा जनसमुदाय आपल्या लाडक्या नेताला निरोप देण्यासाठी हेलिपॅड मैदानावर लोटला होता. यावेळी सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते.
मंगळवारी सकाळी आर. आर. पाटील यांचे पार्थिव मुंबईहून तासगाव येथे आणण्यात आले. तासगावमधील बेलवंडी नाक्यापासून अंजनी पर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरीक सहभागी झाले होते. अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते, नागरीकांना आपले अश्रू अनावर झाले होते.
मागच्या तीन महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. आर. आर. पाटील यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य जनताही हळहळली. त्यांचे असे अचानक निघून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.
आर. आर. पाटील हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले लोकप्रिय लोकनेते होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वकर्तुत्वावर लोकनेतेपदापर्यंतचा प्रवास केला. गावांमध्ये जनहिताच्या योजना राबवून सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला.









