
नवी दिल्ली- पाकिस्तानच्या फरार आरोपीसह इंडियन मुजाहिदीनच्या चार संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानमधून अटक केली आहे. त्यातील एकाची ओळख पटली असून त्याचे नाव वकास असल्याचे विशेष पोलिस पथकाचे आयुक्त एस. एम. श्रीवास्तव यांनी सांगितले.
पाकिस्तानचा फरार आरोपी वकास याचा मुंबईतील झवेरी बाजारमधील १२ जुलै २०११ मध्ये झालेल्या बाँबस्फोटासह अनेक बाँबस्फोट प्रकरणात हात आहे. राजस्थानच्या जोधपूर भागात ते पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवण्याचा त्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.वकास हा पाकिस्तानी दहशतवादी सप्टेंबर २०१० मध्ये असदुल्ला अख्तर उर्फ हद्दी याच्यासह भारतामध्ये पहिल्यांदा आला होता. हद्दीला इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ याच्यासह अटक केली होती. वकास हा स्फोट घडवून आणण्यात तरबेज आहे. जामा मशीद (सप्टेंबर २०१०), वाराणसी (डिसेंबर २०१०), मुंबई (जुलै २०११), पुणे (ऑगस्ट २०१२) व हैदराबाद (फेब्रुवारी २०१३) येथे झालेले बाँबस्फोट वकास यानेच घडवून आणल्याचा दाट संशय आहे.









