नवी दिल्ली- इबोलाचा देशातील पहिला रुग्ण राजधानी दिल्लीत आढळला आहे. पश्चिम आफ्रिकेतील लायबेरिया देशातून आलेल्या या व्यक्तीला दिल्ली विमानतळावर सुरु करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती.
आरोग्य मंत्रालयातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी लायबेरियातून भारतात दाखल झालेल्या या व्यक्तीच्या इबोलाची चाचणी करण्यात आली होती. या व्यक्तीवर लायबेरिया देशात उपचार सुरु होते. त्यावेळी त्याच्या इबोलाचे कोणतेही लक्षण आढळले नव्हते. मात्र दिल्ली विमानतळावर झालेल्या तपासणीनंतर त्याच्या वीर्य चाचणीत त्याला इबोला झाल्याचे आढळले. या रुग्णावर सध्या उपचार सुरु असून त्याला अन्य रुग्णांपेक्षा वेगळे ठेवण्यात आले आहे.
आफिकी देशामध्ये इबोला या आजाराने थैमान घातले आहे. मात्र भारतात आढळलेला हा पहिलाच रुग्ण आहे.
या रुग्णावर दिल्ली विमानतळावरील आरोग्य विभागात उपचार सुरु आहेत. जोपर्यंत या रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही. तोपर्यंत त्याला रुग्णालयातून सोडण्यात येणार नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, परिस्थीती नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यासंदर्भात सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार या आजाराने आतापर्यंत चार हजार ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही या आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. इबोलाविरोधात अद्याप प्रभावी लस शोधण्यात आली नसल्यामुळे त्याच्याविरोधातील लढा अधिक कठीण झाला आहे.










