
खेड- शहरातील महाडनाका परिसरात बांधकाम सुरु असलेली तीन मजली इमारत दुपारी कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगार ठार झाले आहेत. तर अद्याप काही कामगार ढिगा-याखाली अडकले आहेत.
खेड शहरातील जगबुडी नदीच्या जवळ असलेल्या गुलमोहर पार्कमध्ये तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. या इमारतीच्या पहिल्या आणि दुस-या मजल्याचे काम सुरु होते. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इमारतीचे चारही स्लॅब कोसळले. ढिगा-याखाली नऊ कामगार अडकले आहेत. त्यापैकी चार जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्याच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ढिगा-याखाली अडकलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या ठिकाणी १५ कामगार काम करत होते. त्यापैकी नऊ जण इमारतीमध्ये होते. तर अन्य इमारतीच्या परिसरात रेती उचलण्याचे काम करत होते. घटनास्थळी पोलिस, नागरीक आणि क्रेनच्या सहाय्याने मदत सुरु आहे









