
डेहराडून- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तराखंडमध्ये पर्वत भेगाळल्याने भूस्खलनाचे संकट ओढावले असताना चामोली जिल्ह्याला रविवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे या भागातील तब्बल १० हजार नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
उत्तराखंड राज्यातील अनेक परिसरात रविवारी सकाळी भूकंपाचे हल्के धक्के जाणवले. रविवार सकाळी सव्वा पाचच्या सुमारास भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० नोंदविण्यात आली. उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र कोठेही जीवित आणि वित्तहानीचे वृत्त नाही.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्या असून गंगोत्रीकडे जाणारा महामार्ग दरड कोसळल्याने बंद झाला आहे. खबरदारीसाठी राज्य प्रशासनाने भूस्खलन होत असलेल्या भागात मदत व बचाव पथके तैनात ठेवली आहेत.
तांबा खानी भागात १७०० मीटर उंचीवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. या भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे पर्वताला भेगा पडत आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने उत्तराखंडसह श्रीहेमकुंड साहीब, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मध्येही आणखी तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.









