
नागपूर – मोमीनपुरा येथील एका जनरल स्टोर्सवर पोलिसांनी धाड टाकून बुधवारी मोठय़ा प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या उपराधानी नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.साहाय्यक पोलीस आयुक्त भगत यांनी माहिती दिली. मोहंमद नईम व जैजुल आबेदीन अंसारी (४९) रा. मोमीनपुरा असे अटक करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारावर तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर, साहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडसे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व तपास पथक कर्मचारी संजय आठवले, गंगाधर मुटकुरे, चंद्रशेखर वैद्य, अब्दुल करीम, देविदास, सुनील दिवटे, रवी, सचिन भिमटे, चालक विश्वास वाघ यांनी बुधवारी, २७ मे रोजी सायंकाळी मोमीनपुरा येथील आबिद जनरल स्टोर्सवर धाड टाकली. आरोपी अंसारी याचे आदिब जनरल स्टोर्स नामक दुकान आहे. त्याने ड्रॉव्हरमध्ये विक्रीकरिता विविध तीक्ष्ण शस्त्रे ठेवली होती. धाडीदरम्यान तहसील पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना मोठा शस्त्रसाठा आढळला. ही सर्व शस्त्रे मुंबई येथून आणली असून आरोपी मार्च महिन्यापासून शस्त्र विकण्याचा व्यवसाय करीत आहे. दरम्यान तलवार, ३१ खंजर, ८ कुकरी, ४३ चाकू, १४ सुरी, ५ गुप्ती असे एकूण १0२ अवैध शस्त्रे दुकानातून जप्त करण्यात आले. पोलिसांनी शस्त्रांसह ४ लाख ७0 हजार ९८0 रुपयेसुद्घा जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अंसारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुंबईवरून आरोपी कोणत्या मार्गाने शस्त्रे आणायचा आणि कुणाला विकायचा तसेच जप्त शस्त्रे व रोख रक्कम त्याने कुठून आणली, यासंदर्भात तपास सुरू असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त भगत व पो. नि. मुजावर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सपोनि. बोंडसे, पाटील तसेच आठवले, मुटकुरे, वैद्य, अब्दुल करीम, देविदास, दिवटे, रवी, भिमटे, विश्वास वाघ आदी उपस्थित होते.









