
नगर दि. १४ (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कडेल्या उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला ओम्नी व्हॅन धडकून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील पाच जण ठार झाले. हे सर्व जण नातेवाईकाच्या लग्नासाठी चाळीसगावला जात असताना रविवारी सकाळी ११ वाजता नगर-औरंगाबाद हायवेवर माळी चिंचोरा फाट्याजवळ (ता. नेवासा) हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले.
रमेश शंकर सोनार (६२), विमल रमेश सोनार (५०), रमेश एकनाथ सोनवणे (६२), शालिनी रमेश सोनवणे (५५), अजय दत्तात्रय घोडके (५०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अश्विनी अजय घोडके (५०) गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण पुण्यातील हडपसर व पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत.









