एसटी कर्मचा-यांचे रजा आंदोलन स्थगित

मुंबई- वाढीव महागाई भत्ता आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी येत्या १० फेब्रुवारीला पुकारलेले सामूहिक रजा आंदोलन रद्द केले आहे. कर्मचा-यांचा वाढीव महागाई भत्ता तसेच थकबाकीची रक्कम अधिवेशनपूर्वी देण्याचे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने जाहीर केला. त्यामुळे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांना बिनधास्त एसटीचा प्रवास करता येणार आहे.
शुक्रवारी सचिन अहिर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या वेळी राज्य परिवहन मंहाडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, महासचिव हनुमंत ताटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.वेतन कराराच्या तरतुदीनुसार, जानेवारी २०१३ ते सप्टेबर २०१३ या ९ महिन्यांची आठ टक्के वाढीव महागाई भत्त्याची ७२ कोटी रुपयांची थकबाकी, जुलै २०१३ आणि ऑक्टोबर २०१३ या चार महिन्यांची १० टक्के वाढीव महागाई भत्त्याची ४० कोटी रुपयांची थकबाकी होती.ही थकबाकी अधिवेशनपूर्वी महामंडळाला देण्यात येणार असून, कर्मचा-यांना एकरकमी वाटप करण्यात येणार आहे. कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने १० फेब्रुवारीचे नियोजित सामूहिक रजा आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहितीही या वेळी चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 2 = two