
डरबन – प्रेयसीला चोर समजून तिच्यावर गोळया झाडणारा दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने पिस्टोरियसला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. गेल्यावर्षी व्हॅलटाईन डे च्या दिवशी घरात असताना ऑस्करने प्रेयसी रीवा स्टीनकॅंम्पवर चोर समजून तिच्यावर गोळया झाडल्या होत्या. यात रीवाचा मृत्यू झाला होता.
न्यायालयाने ऑस्करची पूर्वनियोजित हत्येच्या आरोपातून सुटका केली होती मात्र सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. फिर्यादी पक्षाने ऑस्कला दहावर्षांसाठी तुरुंगवासात पाठवण्याची मागणी केली होती तर, बचावपक्षाने कमीत कमी शिक्षा म्हणून नजर कैदेची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ऑस्करला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
दोन्ही पाय नसतानाही यशस्वी धावपटू बनणारा ऑस्कर क्रीडा जगतात ब्लेड रनर म्हणून ओळखला जातो. अपंगांसाठी असणा-या पॅराऑलिंपिकमध्ये चमक दाखवल्यानंतर २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत पिस्टोरियसला प्रवेश मिळाला. तेथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.लंडन ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने उपांत्यफेरीही गाठली होती. मागच्यावर्षी घरात असताना त्याने प्रेयसीला चोर समजून तिच्यावर गोळया झाडल्या यात तिचा मृत्यू झाला. कायद्याची पदवीधर असणारी २९ वर्षीय रीवा पेशाने मॉडेल होती.









