
पर्थ- तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ११२ धावांनी दणदणीत पराभव केला आणि तिरंगी मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर इंग्लड संघाची पुरती भंबेरी उडाली आणि विजयासाठी २७९ धावांचे आव्हान स्विकारुन मैदानात आलेल्या इंग्लंडचा डाव ३९.१ षटकांत १६६ धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २७९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लडची सुरुवात खराब झाली. इंग्लडचा सलामीवीर इयान बेल आठ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर टेलर चार धावा करुन बाद झाला. मोईन अलीने खेळपट्टीवर टिकून राहत धावा जमवण्याचा प्रयत्न केला मात्र जॉन्सनने त्याला बाद केले. त्याने २६ धावा केल्या. त्यानंतर आलेला मॉर्गन भोपळा न फोडताही माघारी परतला.
भारताविरुद्धच्या यापूर्वीच्या सामन्यात खो-याने धावा काढणा-या बटलरला या सामन्यात केवळ १७ धावा करता आल्या. तर ख्रिस वोकर्स शून्यावर बाद झाला.
तत्पूर्वी, ग्लेन मॅक्सवेलच्या झुंजार ९५ धावा आणि मिशेल मार्श आणि जेम्स फॉकनरच्या प्रत्येकी अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अडीचशे पार धावसंख्या उभारली. ग्लेन मॅक्सवेलने ९८ चेंडूत तडाखेबाज ९५ धावांची खेळी केली. तर मिशेलने ६८ चेंडूत ६० आणि फॉकनरने केवळ २४ चेंडूत ५० धावा केल्या.
सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलवले. मैदानात उतरेलल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला इंग्लडने पहिल्याच षटकात धक्का दिला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अरोन फिंच एकही धावा न करता आल्यापावली परत गेला. त्यानंतर वॉर्नर १२ धावा करुन अँडरसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर स्मिथने सावध फलंदाजीस सुरुवात केली. यादरम्यान जॉर्ज बेलीच्या रुपाने तिसरा धक्का ऑस्ट्रेलियाला बसला.
त्यानंतर स्मिथही ४० धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर चार बाद सहा अशी धावसंख्या असताना ग्लेन मॅक्सवेल आणि मार्श या जोडीने इंग्लडच्या मा-याचा प्रतिकार करत धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी रचली. मॅक्सवेल शतकाच्या उंबरठ्यावर असताना ब्रॉडच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने ९५ धावा केल्या. त्यानंतर लगेचच मार्श धावचित झाला. तर हॅडिन नऊ, जॉन्सन तीन धावा करुन बाद झाले. शेवटच्या फळीतील जेम्स फॉकनरनेही खेळाचे चांगले प्रदर्शन करत आपल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया २७८ धावांचा टप्पा गाठून दिला.
इंग्लडकडून स्टुअर्ट ब्रॉ़डने सर्वाधिक तीन गडी बाद केले तर अँडरसन याने दोन आणि फिन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









