ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वविजेते

australia-team
मेलबर्न – फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत रविवारी मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने आपणच जगज्जेते असल्याचे पुन्हा सिद्ध केले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली.
मेलबर्न मैदानावरील हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाने दिमाखात विश्वचषक उंचावला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघाने कर्णधार मायकेल क्लार्कला एकदिवसीय क्रिकेटमधून विजयी निरोप दिला. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणा-या न्यूझीलंड संघाकडून त्यांच्या देशवासीयांना मोठी अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंडच्या संघाने अपेक्षाभंग केला. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत न्यूझीलंड इतिहास रचणार असे वाटत होते. न्यूझींलंडचे हे स्वप्न अधुरेच राहिले.
विश्वचषकात पहिल्या सामन्यापासून न्यूझीलंडने विजयाची मालिका कायम ठेवली होती. मात्र त्याला खिंडार पाडली ती ऑस्ट्रेलियाने. जगज्जेतेपद मिळवण्यासाठी न्यूझीलंडने ठेवलेले १८४ धावांचे सोपे आव्हान ऑस्ट्रेलियाने सात विकेट राखून पूर्ण केले आणि सहज विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर न्यूझीलंड संघाने शरणागती पत्करल्याने त्यांचा डाव अवघ्या १८३ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार क्लार्कने आपल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शानदार ७४ धावांची खेळी केली आणि एकदिवसीय क्रिकेटला निरोप दिला.
दुस-याच षटकांत आरोन फिंचच्या रुपाने न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र त्यातून सावरत डेविड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथने दुस-या विकेटसाठी ६१ धावा केल्या. ४५ धावांवर वॉर्नरला बाद करण्यात यश मिळाले. त्यानंतर कर्णधार क्लार्क आणि स्मिथ या जोडगोळीने ११२ धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला. क्लार्कनंतर खेळण्यासाठी मैदानात आलेल्या वॉटसनने स्मिथच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकांत १८३ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी सोपे आव्हान ठेवले. जेम्स फॉकनर आणि मिचेल जॉन्सनच्या अचूक मा-यासमोर न्यूझीलंडच्या सरस फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. यंदाच्या विश्वचषकातील न्यूझीलंडचा दमदार फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी मोठे आव्हान ठेवेल असे वाटले होते. मात्र मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.
न्यूझीलंडच्या ग्रँट एलियटने ८३ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला बाकी खेळाडूंची अपेक्षित साथ लाभली नाही. न्यूझीलंडचे तब्बल सहा फलंदाज केवळ एक अंकी धावसंख्या करुन बाद झाले.
न्यूूझीलंडच्या ब्रँडेन मॅकक्युलमने नाणेफेक जिंकली आणि अपेक्षेप्रमाणेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मैदानावर फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जोरदार धक्का दिला. कर्णधार ब्रँडन मॅकक्युलम भोपळा न फोडताही परतला. विश्वचषकात द्विशतकी कामगिरी करणारा मार्टिन गप्टिल मोठी खेळी करेल असे वाटत असताना मॅक्सवेलने त्याला अवघ्या १५ धावांत तंबूत धाडले. तर विल्यमसन्स केवळ १२ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर न्यूझीलंडच्या ग्रँड एलियटने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर संघाचा डाव सावरला. एलियटने ५१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पहिले तीन विकेट झटपट गमावल्यानंतर एलियट आणि टेलरने मैदानावर जोडी जमवत संघाचा डाव सावरला. मात्र टेलर बाद झाल्यानंतर मात्र न्यूझीलंड संघाला गळतीच लागली. कोरे अँडरसन आणि ल्युके राँचीला शून्यावर बाद करण्यात ऑसी गोलंदाजांना यश आले. तर व्हेटोरीने केवळ नऊ धावा केल्या. एकीकडे बाकीच्या फलंदाज झटपट गाशा गुंडाळत असताना ग्रँट मैदानावर दुस-या बाजूला एकाकी किल्ला लढवत होता. ग्रँटने ८१ चेंडूत ८३ धावा केल्या संघाला दीडशे पार नेले. न्यूझीलंडची ३५ व्या षटकांत तीन बाद १५० ही धावसंख्या होती. त्यानंतर पुढील ३३ धावांत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचे तब्बल सात गडी बाद केले. आणि न्यूझीलंडचा डाव १८३ धावांत संपुष्टात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 − = two