ओबामांच्या सुरक्षेसाठी ९० हजार सैनिक

images
नवी दिल्ली- १९६२ मध्ये चीनने आक्रमण केल्यानंतर १५ हजारांची एक अशा सहा तुकड्या भारत-चीन सीमेवर भारताने तैनात केल्या होत्या. आता भारताच्या ६५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी विविध सुरक्षा संस्थांचे ९० हजार सैनिक तैनात केले जाणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे १६ हजार सैनिक, सीआयएचे एजंट, सिक्रेट सव्‍‌र्हिस एजंट आदी सुरक्षेचा लवाजमा असेल.
या सुरक्षेसाठी खास ३५ श्वान तैनात केले असून, त्यांना २० आठवड्यांचे खास प्रशिक्षण दिले आहे. या श्वानांच्या तोंडाला खास प्रकारचा मास्क लावला आहे. या मास्कमुळे साध्या गोळ्यांचा कोणताही परिणाम त्या श्वानांवर होणार नाही. तसेच व्हीव्हीआयपी गाड्या पार्किंग करताना त्या एकाच दिशेने कराव्या लागतील. या गाड्या पार्क केल्यानंतर त्यांच्या चाव्या अमेरिकन एजन्सी ताब्यात घेतील. ओबामा यांच्यासमवेत सहा विमाने येणार आहेत.
तसेच ओबामा यांच्यासारख्या दिसणा-या दोन व्यक्ती या विमानात असतील. २६ जानेवारी रोजी राजपथावर जिथे मुख्य संचलन होणार आहे, तिथे भारताच्या राष्ट्रपतींसमवेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा, त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार आहेत. व्यासपीठाच्या भोवती ३०० मीटरपर्यंत सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे. राष्ट्रपती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारताचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांच्या खेरीज अन्य कोणालाही त्या व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार नाही.
दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अमेरिकन सिक्रेट एजन्सी आणि सीआयएच्या अधिका-यांनी आज रविवार असूनही घेतला. दिल्ली मेट्रोच्या सर्व स्टेशनांभोवती खडा पाहरा सोमवारपासून तैनात करण्यात येणार आहे. राजपथाकडे येणारे सर्व मार्ग उद्यापासून सील केले जाणार आहेत. त्या मार्गावरून जाणा-या वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. दिल्ली विमानतळाच्या भोवती कडक सुरक्षाव्यवस्था रविवारपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे अनेक लोकांना जाकीट घातल्याशिवाय रस्त्यावरून फिरणे शक्य होत नाही. अशा जाकिटांची तपासणीही करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. प्रजासत्ताक दिनी विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी खास रडार आहे. जमिनीपासून हवाई मार्गावर कडेकोट सुरक्षा ठेवल्याने राजधानीला लष्करी छावणीचे रूप आले आहे. या सुरक्षा व्यवस्थेसाठी मल्टी एजन्सी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यातून राजधानीतील प्रत्येक भागावर लक्ष ठेवण्यात येईल. अमेरिकेच्या सिक्रेट सव्‍‌र्हिसचे एजंट भारतात पोहचले असून, त्यांनी दिल्ली व आग्रा येथे तपासणी सुरू केली आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येताना ओबामा हे स्वत:च्या बुलेटप्रूफ लिमोझिनमधूनच येण्याची शक्यता आहे. ओबामा बसल्यानंतर व्हीव्हीआयपी कक्षाला भारताच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि सिक्रेट सव्‍‌र्हिसेस एजंटचे कडे असेल. त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधी पथक तयार केले आहे. हे पथक राजधानीतील कोणत्याही हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये जाऊन अचानक तपासणी करणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− two = 4