
औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन सुरुवातीपासून एमआयएमच्या पक्षात अंतर्गत असंतोष खदखदत होता. तो शुक्रवारी पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे समोर आला. तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन झालेल्या मतभेदांचे पर्यवसन शुक्रवारी हाणामारीत झाले. १० एप्रिलला निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
यावेळी एमआयएमचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले अमजद खान यांच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे नेते डॉ. गफार कादरी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला केला .खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या कादरी यांच्या समर्थकांनीही अमजद खान यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
याआधी तिकीट वाटपावरुन पक्षांतर्गत मतभेदांमुळे एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी पक्षाच्या तिकीट वाटप समितीचा राजीनामा दिला होता.येत्या २१ एप्रिलला औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. तर मतमोजणी २३ एप्रिलला होणार आहे. एमएमआयने या निवडणुकीसाठी आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.









