यवतमाळ, १६- तुम्ही स्वत:चे करिअर घडविण्यासाठी सर्वप्रथम मल्टिटास्किंग व मल्टिलँग्वेज स्कील हस्तगत केले पाहिजे. मी ग्रामीण भागातला आहे, मी मुलगा किंवा मुलगी आहे ही मानसिकता बाळगू नये. सर्व जग तुमच्यासाठी खुले आहे. स्वत:वर विश्वास ठेवून स्वत:च्या कौशल्याचा वापर फक्त ग्रेड मिळविण्यासाठी न करता करिअर घडविण्यासाठी व समाजासाठी करावा. स्वत:च्या मेहनतीने व अनुभवाने सतत समोर जाण्याचा प्रयत्न करावा. आपल्या तर्कशास्त्राचा जास्तीत जास्त वापर करून स्वत: काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांची उत्कृष्ट प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन डी. लिंक मुंबई व गोवा विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट राज जाधव यांनी केले.
स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीयस्तरावरील ‘एक्सप्लोर-१५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिपप्रज्वलन विजय ठाकरे (मॅनेजिंग डायरेक्टर सीम सॉफ्ट टेक्नॉलॉजी) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अजाबराव वातीले, सचिव डॉ. शीतल वातीले, संचालक पवन वातीले, प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर विभागप्रमुख प्रा. हेमंत बारडकर, प्रा. डॉ. मिलिंद सरोदे, प्रा. विजय नेवे, संयोजक प्रा. महेश नालमवार, आयोजक समिती सचिव प्रा. मिनल खंडारे व सहसचिव प्रा. डॉ. अमरदीप शेंडे उपस्थित होते.
पुढे बोलतांना राज जाधव म्हणाले की, येणाºया काळामध्ये जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ओपन सोर्स कम्युनिटीची स्थापना व त्याचा प्रसार करण्याकरिता सर्वतोपरी तांत्रिक सहकार्य करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये स्मार्ट होम प्रणाली विकसित करण्याबदल सविस्तर मार्गदर्शन केले. जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट कक्ष प्रस्थापित करण्यात आलेला असून त्या अंतर्गत विविध आॅपरेटिंग सिस्टिम, लिनक्स, फेडोरा व इतर यांचा विस्तृत प्रमाणामध्ये वापर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी राज जाधव यांनी महाविद्यालयातील आयोजित सभेत सचिव डॉ. शीतल वातीले, प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर यांच्या सोबत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासंबंधी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व महाविद्यालयाची प्रगती अशा विविध विषयांवर चर्चा केली. इजिनिअरिंग एज्युकेश व इंडस्ट्रीज यामध्ये इंटरअॅक्शन करून दुवा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. याप्रसंगी संस्था सचिव डॉ. शीतल वातीले म्हणाले की, जगदंबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था आपल्या कार्यात सदैव अग्रेसर राहिली आहे. एका छोट्याशा रोपट्यापासून संस्थेची झालेली सुरुवात ही मोठ्या वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चांत दर्जेदार शिक्षण देण्याचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्याकरिता संस्था सदैव प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.
एक्सप्लोर-१५ या दोनदिवसीय टेक्निकल इव्हेंटमध्ये देशभरातील सुमारे १४०० विद्यार्थी सहभागी झाले असून त्यामध्ये प्रोजेक्ट प्रेझेंटेशन लॅन गेमिंग, पेपर पेझेंटेशन, वेब डिझाइनिंग, पोस्टर पेझेंटेशन, रोबोवार, रोबोरेस, मॉडेल मेकिंग, ब्लाइंड-सी सर्किट डिझाइनिंग, गुगलर अशा विविध तांत्रिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजक प्रा.महेश नालमवार एक्सप्लोर – १५ ची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे संचालन रूपा खंडारकर व विक्की बुंदीले तसेच आभार आयोजक समिती सचिव प्रा.मिनल खंडारे यांनी केले.










