काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर 8 डिसेंबरला मोर्चा – प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे

index53bbebcbc9b52.jpg000
नागपूर – अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी व इतर आस्मानी संकटांमुळे राज्याच्या सर्वच भागातील शेतकरी भरडून निघाला आहे. पिकांचे मोठे नुकसान त्याला सोसावे लागले आहे. प्रचंड अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. शेतक-यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 8 डिसेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.
रविवारी, दि. 23 नोव्हेंबर 2014 रोजी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. राजेंद्र मुळक, आ. अब्दुल सत्तार, आ. विरेंद्र जगताप, आ. राहुल बोंद्रे, आ. अमर काळे यांच्यासह प्रदेश काँग्रेस व नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आ. माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप सरकारचे केवळ शेतक-यांकडेच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे घडलेल्या दलित समाजातील तिहेरी हत्याकांडाकडेही दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. जवखेडा येथील हत्याकांडाचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने होत आहेत. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अद्याप जवखेडा येथील पीडित दलित कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळालेला नाही.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी घटनेतील तरतुदींचा भंग केल्याचा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. परंतु, भाजपने ज्या पद्धतीने विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यातून त्यांचे बहुमत असल्याचे अजिबात स्पष्ट होत नाही. नवनियुक्त सरकारचा विश्वासदर्शक ठराव मतविभाजन न करता ध्वनीमताने मंजूर करणे असंयुक्तिक असल्याचे ते म्हणाले. या घटनेकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर आले असता त्यांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप करून विधानसभेतील 5 आमदारांना निलंबित करण्यात आले. परंतु, हे आमदार निर्दोष असून, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने हा प्रकार केलेला नाही. चौकशीत काँग्रेस आमदारांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वासही आ. माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + six =