
नवी दिल्ली (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी ७१ जणांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने गाझियाबादमधून राज बब्बर यांना उमेदवारी दिली आहे. तर अभिनेत्री नगमा यांना मेरठमधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने याआधी १९४ जणांची पहिली यादी जाहीर केली होती.
काँग्रेसने जाहीर केलेल्या दुस-या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. जालन्यातून विलास औताडे यांना, हिंगोलीतून राजीव सातव यांना, भिवंडीतून विश्वनाथ पाटील, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी, हातकणंगलेमधून काल्लापा अवाडे, वर्ध्यातून सागर मेघे, अकोल्यातून हिदायत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राज्यातील पुणे, नांदेड आणि औरंगाबाद या जागांवरील उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाहीत.









