
दारव्हा – धर्म हा प्रत्येकाच्या वैयक्तीक श्रध्देचा भाग असून, राजकर्त्यांनी जाती, पंथ, धर्म, भाषा न पाहता देशातील प्रत्येक समूहाच्या विकासाकडे लक्ष देणे अभिप्रेत असते़ स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या देशाचा सर्व समावेशक विकास कॉंग्रेसनेच केला असून, कॉंग्रेस पक्ष विकासाच्या नावावर लोकांना मतदान मागते तर विरोधक जाती-पातीच्या नावावर मते मागतात अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे यांनी केली़ आज गुरुवारी दारव्हा येथील कविता मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते़
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहे़ आज गुरुवारी दिग्रस विधानसभा क्षेत्रीय कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ या मेळाव्याचे उद्घाटक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर अध्यक्ष म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे होते़ प्रमुख अतिथी म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. वामनराव कासावार, माजी खा़ हरिभाऊ राठोड, शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, जीवन पाटील, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अॅड़ सीमा तेलंगे, डॉ़ टी़सी़ राठोड, जि़प़ सदस्य राहुल ठाकरे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, राजेंद्र माहुरे, वसंतराव निरपासे, नगराध्यक्ष अशोक चिरडे, सैय्यद फारुख, वजाहत मिर्झा, माधुरी गडपायले, विजया सांगळे, ज्योती उपलेंचवार आदी उपस्थित होते़ पुढे बोलताना आ़ ठाकरे म्हणाले की, कॉंग्रेसने कुठलाही जातीभेद न पाळता देशातील प्रत्येक वंचित घटकाच्या विकासासाठी प्रयत्न केले़ ज्या काळात ग्रामीण भागात मुलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या काळात रस्ते, पूल, शाळा, आरोग्याच्या सुविधा पोहचविण्याचे काम कॉंग्रेसने केले़ विरोधी पक्षांकडे विकासाची कुठलीही दृष्टी नसून, देशाची अखंडता संकटात घालण्याचे काम ते करताहेत, असा घणाघात त्यांनी केला़ आ़ माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते मुख्यमंत्री विकास निधी अंतर्गत मंजूर ३ कोटी ५४ लाख रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन गोळीबार चौक व बसस्थानक चौकात करण्यात आले़ यावेळी ना़ शिवाजीराव मोघे, आ़ वामनराव कासावार, माजी़ खा़ हरिभाऊ राठोड आदींची भाषणे झाली़









