काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप दोन दिवसांत
मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यासाठी राष्ट्रवादीने सहकार्य करावे. लवकरात लवकर चर्चा पूर्ण करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी चार दिवसांत जागावाटपाच्या निर्णयाची अपेक्षा केली होती. त्यावर बोलताना ठाकरे यांनी दोन दिवसांतच चर्चा पूर्ण करू, असे स्पष्ट केले. टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शुक्रवारी ‘रामटेक’वर झाली. आघाडीचे जागा वाटप लवकर व्हावे, अशी अपेक्षा या वेळी सर्वच नेत्यांनी व्यक्त केली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जागावाटप पुढील चार दिवसांत झाले पाहिजे, असे सांगितले. मात्र काँग्रेसने दोन दिवसांतच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.जागावाटपाबाबत चर्चा करण्याचे अधिकार अँटोनी समितीने दिले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आता ही चर्चा कधी संपवायची, हे राष्ट्रवादीने ठरवावे, दोन दिवसांत चर्चा पूर्ण करण्यावर काँग्रेसचा भर असेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि अन्य पक्षांनाही सामावून घेतले जाईल, असेही ते म्हणाले.दरम्यान, जागावाटपाबाबत काँग्रेसला राष्ट्रवादीने कोणताही ‘अल्टीमेटम’ राष्ट्रवादीने दिला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. ते राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.मात्र जागावाटप लवकर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनीही व्यक्त केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक तयारीला लागले आहेत. त्यात आघाडीचे अजूनही जागावाटप झाले नाही. तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीला समोरे जाण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. जागावाटप झाल्यानंतर पक्षाच्या परंपरेनुसार लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.










