काँग्रेस व राष्ट्रवादीमुळे शेतकरी बरबाद – खा. हंसराज अहीर

यवतमाळ : सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीने जिल्ह्यातील शेतकर्‍याला बरबाद केले आहे. संकटात असलेल्या शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करत भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीत कमिशनवरून वादावादी सुरू आहे. अशा सत्ताधार्‍यांना धडा शिकवा, असे आवाहन भाजपचे खासदार हंसराज अहीर यांनी केले.

आर्णी तालुक्यातील तरोडा येथून १५ डिसेंबर रोजी निघालेल्या शेतकरी पदयात्रेचा आज दुपारी यवतमाळातील एलआयसी चौकात समारोप करण्यात आला. यावेळी खासदार हंसराज अहीर म्हणाले, सत्ताधारी शेतकर्‍याला मुबलक वीज आणि पाणी देण्यात अपयशी ठरले आहे. या शासनाला कुणीही माझ्या मुलाला खिचडी द्यावी, असा अर्ज केला नाही. शेतकर्‍यांच्या मनगटात उत्पादन घेऊन मुलाला शाळेत डब्बा देण्याची ताकद आहे. मात्र हे सरकार शेतमालाला कमी भाव, अतिरेकी भारनियमन आणि सिंचन प्रकल्प अर्धवट ठेवून अडचणीत आणण्याचे काम करत आहे. आज महाराष्ट्राची यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या सत्रामुळे देशात नाचक्की झाली आहे. बाभूळगाव येथे सिंचन परिषदेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यावर भाष्य करण्याऐवजी पर्यटन विकासाला दहा कोटी देत असल्याची केविलवाणी घोषणा केली. अशा निर्ढावलेल्या सत्ताधार्‍यांना धडा शिकविण्याचे आव्हान खासदार अहीर यांनी केले.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार मदन येरावार, दिवाकर पांडे, नगराध्यक्ष योगेश गढीया, मनोज इंगोले, अशोक उईके, उद्धवराव येरमे, बाजार समिती सभापती सूर्यकांत गाडे, चंद्रकांत गाडे, भाजपाचे संघटक श्रीकांत देशपांडे, रवींद्र भुसारी आदी उपस्थित होते. या सभेत माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे यांनी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. आता दोन्ही पक्षांकडून परस्परांवरच गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. ही दुर्दैवी बाब आहे. आतापर्यंंत संकटात असलेल्या शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी कधीच काँग्रेस वा राष्ट्रवादीने मोर्चा काढला नाही. राज्यात ७२ कोटींचा सिंचन घोटाळा करणार्‍या राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नेत्यांना पैशाची मस्ती चढली आहे. त्यांना सत्तेतून उखडून फेका, असे आवाहन राजाभाऊ ठाकरे यांनी केले. यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, चंद्रकांत गाडे, रवींद्र भुसारी, माजी आमदार मदन येरावार, दिवाकर पांडे आदींनी मार्गदर्शन केले. सभेचे संचालन भाजपा उपाध्यक्ष राजू पडगिलवार यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 1 = five