
नवी दिल्ली -माजी आयपीएस अधिकारी आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील एक बिनीच्या शिलेदार किरण बेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. बेदी या आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
भाजपच्या ऑनलाइन सदस्य नोंदणी प्रक्रियेनुसार फोनवरून ‘मिस्ड कॉल’ दिल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बेदींना पक्षात औपचारिक प्रवेश दिला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेही यावेळी उपस्थित होते. किरण बेदी या दिल्ली विधानसभेची निवडणूक निश्चितच लढतील, असे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, त्यांचा मतदारसंघ कोणता असेल हे सांगण्याचे शहा यांनी टाळले.
दिल्ली भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल असे विचारले असता, ‘भाजपमध्ये मुख्यमंत्री बनण्याच्या क्षमतेचे अनेक नेते आहेत. पण सध्या आम्ही निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा निर्णय पक्षाचे संसदीय बोर्ड करेल,’ असे शहा म्हणाले.
भाजपच्या केजरीविरोधी प्रचाराला बळ
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात किरण बेदी व केजरीवाल यांनी एकत्र काम केले होते. केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढल्यानंतर बेदी त्यांच्यापासून दूर झाल्या होत्या. केजरीवालांची कामाची पद्धत कशी आहे? त्यांचे कच्चे दुवे कोणते आहेत? याची बेदी यांना पूर्ण माहिती आहे. बेदी यांच्या प्रवेशामुळं भाजपच्या केजरीविरोधी प्रचाराला मोठे बळ मिळणार आहे.









