कुंभारकिन्ही शिवारात ना. रावते व पालकमंत्री राठोड यांनी केली पेरणी

_DSC1087
शासन व शिवसेना शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणार
यवतमाळ, दि.18 : पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची अवस्था आणि अस्वस्थता आम्ही समजू शकतो. असे संकटं येतील आणि जातील, परंतु एकदा गेलेला जीव परत येत नाही. त्यामुळे कितीही संकटं आली तरी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, शासन व शिवसेना पक्ष वैयक्तिकस्तरावर आपल्या सोबत आहे. काय लागेल ती मदत आम्ही करू, असा भावनिक आधार देत, राज्याचे परिवरहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दारव्हा तालुक्यातील हातणी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. उत्तमराव चौधरी यांच्या कुंभारकिन्ही शिवारातील शेतात बियाण्यांअभावी रखडलेली पेरणी पूर्ण करून दिली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ना. दिवाकर रावते यांनी अडचणीतील शेतकऱ्यांना विशेषकरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘पेरते व्हा’ असा संदेश देत त्यांना पक्षातर्फे शेतीसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी अभिनव असे सकारात्मक आंदोलन सुरू केले. 22 जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या सांत्वना भेटी दरम्यान अनुभवलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथांनी अस्वस्थ होऊन ना. दिवाकर रावते व पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 500 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शिवसेना पक्षातर्फे शेतीसाठी सर्वेतोपरी सहाय्य करण्याची घोषणा केली. त्यानुसार पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून 1 जुलै रोजी यवतमाळ नजीकच्या इचोरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अंकूश खडके यांच्या शेतात परेणी करून या उपक्रमाची सुरूवात केली होती. तेव्हापासून जिल्ह्यात शिवसैनिकांमार्फत अनेक शेतकऱ्यांना या प्रकारे मदत सुरू आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही शिवारात आज कापूस दिंडीचे प्रणेते, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
हातणी येथील शेतकरी उत्तमराव चौधरी यांनी 2005 मध्ये कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून यावर्षी पैशाअभावी त्यांची कुंभारकिन्ही शिवारातील चार एकर शेती पडीक होती. ही बाब दारव्हा तालुक्यातील शिवसैनिकांना समजताच या कुटुंबाला मदत करण्यासाठी शिवसैनिक सरसावले. त्यानुसार आज दुपारी ना. दिवाकर रावते, ना. संजय राठोड यांच्या उपस्थितीत चौधरी यांच्या शेतात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. यावेळी मंदा उत्तमराव चौधरी या महिला शेतकऱ्यासह त्यांचा मुलगा संदीप उपस्थित होते. ना. रावते व ना. राठोड यांनी शेतातील दोन तास पेरून दिले. त्यानंतर ना. संजय राठोड यांनी ट्रॅक्टर चालवून पेरणी करून दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना, ना. रावते यांनी, आमचे ‘पेरते व्हा’ हे आंदोलन सकारात्मक स्वरूपाचे असून, अडचणीतील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याच्या घरापर्यंत, शेतापर्यंत जाऊन मदत करण्यासाठी आयोजिलेले आहे. शासन शेतकऱ्यांना मदत करतच आहे, परंतु शिवसेना या पक्षाचीही प्रथम बांधिलकी ही शेतकरी आणि सामान्य माणसांशी आहे. त्यामुळे हे घटक अडचणीत असताना आम्ही स्वस्थ नाही बसू शकत. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने आमच्याकडून शक्य ती मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत, असे सांगितले. शेतकरी जगाचा पोषिंदा आहे. त्याला तुमची सहानुभूती नको तर, आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणीतरी उभे आहे, हा विश्वास हवा आहे. तो विश्वास आम्ही त्यांना देत आहो. ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’, ही शिवसेनेची शेतकरी हिताची भूमिका ठरली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी व उपजिविकेचे कायम साधन मिळावे यासाठी अशा कुटुंबांना लवकरच शेळी, गाय, शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे ना. रावते यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी आमचे पडीक शेत नांगरून, वखरून दिले. पेरणीसाठी बियाणे, खत आणून दिले. बँकेने कर्ज नाकारल्यानंतर शिवसेनेने मदत दिली नसती तर यावर्षी शेती केलीच नसती, अशी प्रतिक्रिया शेतकरी मंदा चौधरी यांनी व्यक्त केली. ना. रावते व ना. राठोड यांनी पेरणी केल्यानंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनोद चव्हाण, सुधाकर सिंगाते, अनिल खडसे यांनी या शेतातील पेरणी पूर्ण करून दिली. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुखद्वय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, अरविंद गादेवार, दारव्हा तालुका प्रमुख मनोज सिंगी, दिग्रसचे राजकुमार वानखडे, नेरचे गजानन भोकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.
मातोश्रीवरून विचारणा
ना. दिवाकर रावते व ना. संजय राठोड हे कुंभारकिन्ही येथे चौधरी यांच्या शेतात पोहचताक्षणीच मुंबई येथून ‘मातोश्री’वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ना. रावते यांना फोन आला. यावेळी ना. रावते यांनी चौधरी यांचे शेत पडीक कसे राहिले व आता त्या शेतात शिवसैनिकांच्या वतीने काय काय केले जाणार आहे, याची कल्पना दिली. पलिकडून उद्धव ठाकरे यांनीही संबंधित शेतकरी महिलेची आस्थेवाईपणे विचारपूस करून तिला हवी ती मदत द्या, अशा सूचना ना. रावते यांना केल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ना. संजय राठोड यांच्याशीही संवाद साधून ते करीत असलेल्या उपक्रमाचे कौतूक करीत या उपक्रमात गरजू शेतकऱ्यांच्या मदतीत सातत्य ठेवण्याच्या सूचना केल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 + = seven