
नेर, दि. ६ – यवतमाळ रोडवरील केएम प्रकल्पाचे सोयाबीन असलेले गोडाऊन सब्बलीच्या सहाय्याने फोडून १ लाख ४८ हजार ४०० रुपयाचे सोयाबीन लंपास केले. ही घटना काल रात्री घडली होती. या प्रकरणाचा छडा अवघ्या तीन तासात लावण्यात पोलिसांना यश आले.
सोयाबीनचे पोते फाटल्याने चोरट्यांचे बिंग फुटले. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत २७ क्विंटल सोयाबीनसह एका महिलेस अटक करण्यात आली. कंपनीनेवारंवार सोयाबीन चोरीची आकडेवारी बदलल्याने सदर कंपनीचे काम संशयाच्या भोवºयात सापडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केएम प्रकल्पांतर्गत शासनाच्या वतीने सोयाबीन खरेदीचा कंत्राट अेडीएम कंपनी (अकोला) खरेदी करते. सदर कंपनीचे गोडाऊन बुलडाणा अर्बन सोसायटीच्या गोडाऊन जवळ आहे. बुलढाणा बँकेचे व सदर कंपनीची रखवालदारी एकच चौकीदार करते. सदर चौकीदारास कंपनीने दोन दिवसापूर्वी बंद केले. त्यामुळे सदर गोडाऊनमध्ये असलेले हजारो क्विंटल सोयाबीन रामभरोसे ठेवण्यात आले होते. मध्यरात्री संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन मालवाहू वाहनाने येऊन सब्बलीच्या सहाय्याने गोडाऊन फोडले व ५३ क्विंटल सोयाबीन चोरून नेले. सकाळी ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. कंपनीच्या कर्मचाºयांनी सुरुवातीला सोयाबीनची पाहणी केली. यावेळी २० पोते व ५३ कट्टे सोयाबीन चोरी गेल्याची माहिती दिली. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तब्बल २ वाजता सदर चोरीची माहिती नेर पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक शाम सोनपराते, जमादार हरिचंद्र कार, राजेश चौधरी, प्रकाश धारगावे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सांडलेले सोयाबीन व वाहनाच्या टायरच्या मार्कवरून सदर पोलिसांनी छडा लावला. पोलीस यवतमाळ बाजार समितीत पोहोचले. त्यावेळी चोरीचे सोयाबीन येथे आढळून आले. २७ क्विंटल सोयाबीनसह महिला मीरा अशोक पवार (३५) वर्ष रा. अशोकनगर नेर या महिलेस ताब्यात घेतले. वृत्तलिहेस्तोवर याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. वारंवार बदलवलेली सोयाबीन आकडेवारी व पोलिसांनी जप्त केलेला माल यामुळे कंपनीच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.









