केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

index.jpeg1नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा जातमुचलका न भरल्याने त्यांना २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

या वर्षी ३१ जानेवारी रोजी केजरीवाल यांनी भारतातील ‘सर्वाधिक भ्रष्ट’लोकांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांचेही नाव होते. त्यामुळे गडकरी यांनी केजरीवाल यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. खोट्या, निराधार, कारस्थानी आणि बदनामीकारक दाव्यांमुळे आपली प्रतिमा मलीन झाली असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते.

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, जामीनासाठी केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना कोठडीत जावे लागले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ मे ला होणार आहे. तोपर्यंत केजरीवाल यांना तिहार तुरुंगात रहावे लागणार आहे. कोणताही गुन्हा केला नाही, हे एक राजकीय प्रकरण आहे, असे सांगत केजरीवाल यांनी वैयक्तिक जातमुचलका भरण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच याआधीही अशाप्रकारे न्यायालयात खटले दाखल असून तेथे न्यायालयाने आपल्याला नियमित तारखेला हजर होण्याच्या अटीवर जामीन दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.मात्र आपण एका आप सारख्या जबाबदार पक्षाचे नेतृत्व करता, त्यामुळे आपण आम आदमी प्रमाणे कायदेशीर प्रक्रीया पूर्ण कराव्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र तरीही केजरीवाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 6 = twelve