
नैरोबी- केनियातील गॅरिसा विद्यापीठातील कॅम्पस परिसरात गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एकूण १४७ जण ठार झाले. तर ८० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांनी विद्यापीठ परिसरात प्रवेश करत अंधाधुंद गोळीबार केला.
केनिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे जवान आणि अतिरेकी यांच्यात तब्बल १६ तास धुमश्चक्री चालू होती. संरक्षण दलाची मोहीम आता संपली आहे. चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तसेच गॅरिसा शहरात आणि जवळपासच्या परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेनेही केनियाला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. अल शबाबचा नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.केनियामध्ये १९९८ मध्ये अमेरिकी दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतरचा हा देशातील दुसरा सर्वात मोठा हल्ला आहे.









