कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला

govind-pansare
कोल्हापूर – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूरच्या अँस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळी आठच्या सुमारास गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील सागरमळा भागातील रहत्या घराजवळ हल्ला झाला. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर गोळया झाडल्या.
हल्लेखोरांनी एकूण तीन गोळया झाडल्या. त्यातील एक गोळी पानसरे यांच्या मानेला लागली. एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. उमा पानसरे यांनाही एक गोळी लागली मात्र त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गोविंद पानसरे यांची प्रकृती चिंताजनक असली तरी, स्थिर आहे. दुपारपर्यंत डॉक्टर पानसरे यांच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती देऊ शकतात. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणाला पोलिसांनी वेढा घातला असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटवरुन या हल्ल्याचा निषेध केला. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर हल्ल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. मी या हल्ल्याचा निषेध करतो. मी कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो असून, आरोपींना पकडण्यासाठी वेगाने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण राज्यभरात नाकाबंदी करण्यात आली असून, तपासासाठी दहा पथके बनवण्यात येणार आहेत. गोविंद पानसरे टोलविरोधी आंदोलनात सक्रीय आहेत. आघाडीवर राहून ते या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पध्दती दोन वर्षांपूर्वी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी मिळती-जुळती आहे.
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची भररस्त्यात गोळया झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. सकाळच्या समयी डॉ. दाभोळकर यांना एकटयाला गाठून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळया चालवल्या होत्या. अजूनही या मारेक-यांचा शोध लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 + six =