
कोल्हापूर – कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक कऱण्यात आली.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली.
३० जानेवारी रोजी माळवी यांना १६ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. शिवाजी पेठेत राहणा-या संतोष पाटील यांची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती. या जागेचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित कागदपत्रावर महापौरांची स्वाक्षरी आवश्यक होती.
या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी माळवी यांनी स्वीय सहायकअश्विन गडकरी यांच्या मार्फत चाळीस हजारांची लाच मागितली. अखेर संतोष पाटील सोळा हजार रुपये देण्यास तयार झाले.या प्रकरणी पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता विभागाने सापळा रचून माळवी आणि त्यांचे पीए अश्विन गडकरी यांना ताब्यात घेतले होते.
त्यानंतर दुस-याच दिवशी प्रकृतीच्या कारणास्तव माळवी यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली.









