अपघातात दोन ठार
यवतमाळ : भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे तालुक्यातील सरुळ गावाजवळ घडली. मृत दोघेही यवतमाळचे रहिवासी होते.
सागर उदय देशमुख (२0) रा. दत्तचौक यवतमाळ आणि स्वप्निल अशोक लोखंडे (२0) रा. वैद्यनगर यवतमाळ अशी मृतांची नावे आहे. तर विक्की अशोक सौरंगपते (२0) व स्वप्निल उईके (२0) रा. यवतमाळ अशी जखमींची नावे आहे. २५ जानेवारीच्या मध्यरात्री हे चौघे मित्र यवतमाळवरून कारने (एमएच-४0-टीसीडी-९९९) आर्वी येथे जात होते. बाभूळगावमार्गे जात असताना सरुळ गावापुढील एका वळणावर कार लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. धडक एवढी जबरदस्त होती की, कारचा चुराडा झाला. या अपघाताची माहिती बाभूळगाव पोलिसांना होताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर बाळबुद्धे, सचिन शेलोकार, वाहतूक पोलीस अनिल सोळंके घटनास्थळी दाखल झाले.
झाडामध्ये फसलेली गाडी त्यांनी ओढून काढली. त्यावेळी कारमधील सागर व स्वप्निल मरण पावल्याचे आढळून आले. तर स्वप्निल उईके व विक्की सौरंगपते गंभीर जखमी असल्याचे आढळून आले. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.
सागर देशमुख हा वडिलांच्या ट्रॅव्हल्स व्यवसायात मदत करायचा तर स्वप्निल लोखंडे हा दत्तचौकात असलेल्या वडिलांचा हॉटेल व्यवसाय सांभाळायचा. स्वप्निलच्या बहिणीचे लग्न ठरले असून सर्व परिवार लग्नाच्या तयारीत होता. घटनेने दत्तचौकात शोककळा पसरली.
……………………………………..
‘याहू’चे २७ कोटीहून अधिक ईमेल पासवर्ड हॅक
न्यूयॉर्क- ‘याहू’ संकेतस्थळावरील ईमेलचे यूझरनेम आणि पासवर्ड हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पासवर्ड हॅक झाल्याच्या वृत्ताला याहू कंपनीने दुजोरा दिला असला तरी नेमके किती इमेलचे पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत त्याबद्दल मात्र याहूने कोणताही माहीती दिली नाही.
गुगलच्या जी-मेलपाठोपाठ ‘याहू’च्या मेल वापरणा-यांचा जगात दुसरा क्रमांक आहे. जगभरात २७ कोटी ३० लाख लोक याहू मेलचा वापर करतात. एकट्या अमेरिकेत आठ कोटी दहा लाख ई-मेलधारक असल्याचे फर्मस्कोर या संस्थेने केलेल्या संशोधनात आढळले आहे. हॅकर्स बनावट मॅसेज पाठवून इमेलचे पासवर्ड हॅक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
‘याहू’ने आपल्या अधिकृत ब्लॉगवर याची माहिती दिली. पासवर्ड हॅक केलेल्यांनी ‘याहू’च्या ईमेल अकाऊंटमधील नावे आणि ईमेल आयडी बघितले आहेत. तसेच या अकाऊंटमधून पाठवण्यात आलेले मेल्सही या चोरट्यांनी तपासले आहेत. तसेच ईमेल अकाऊंटधारकांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी हे चोरटे बनावट मेल पाठवू शकतात अशी शक्यताही आहे. त्यामुळे कोणत्याही मेलला उत्तर देताना सावधगिरी बाळगावी असे याहूकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









