
कोलकाता – क्रिकेट सामन्यादरम्यान गंभीर जखमी झालेल्या ईस्ट बंगाल क्लब क्रिकेटच्या अंकित केसरी या क्रिकेटपटूचे सोमवारी निधन झाले.
तीन दिवसांपूर्वीच भवानीपूर क्लबच्या संघाविरुद्ध खेळत असताना क्षेत्ररक्षणादरम्यान झेल घेण्याच्या नादात अंकितची आपला सहकारी खेळाडू सौरव मंडलशी जोरदार टक्कर झाली. यामध्ये अंकित गंभीर जखमी झाला.अंकितवर गेल्या तीन दिवसांपासून कोलकाताच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी अंकितला हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
२० वर्षीय अंकितने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ४७ सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत बंगाल अंडर १९, ईस्ट झोन अंडर १९ आणि बंगाल अंडर २३ या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले.काही महिन्यांपूर्वीच सिडनीच्या क्रिकेट मैदानावर बाऊंसर डोक्यावर आदळल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे निधन झाले होते. २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे निधन झाले होते.









